पालेभाज्यांच्या भावाचे रॉकेट उतरले
---
कोथिंबीर २०, मेथी १५, तर इतर पालेभाज्या १० ते १५ रुपये जुडी
---
छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : काही दिवसांपासून फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे भाव कमी झाले. सध्या कोथिंबीर २० रुपये, तर मेथी १५ रुपये जुडीने मिळत आहे. चुका, शेपू, पालक, करडी आणि तांदुळजा या पालेभाज्या १० ते १५ रुपये जुडीने विकल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत ग्राहकांचा कल स्वस्त पालेभाज्यांकडे अधिक दिसून येत आहे.
शहरातील किरकोळ बाजारात मागील महिनाभरापासून फळभाज्यांचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे रोजच्या जेवणातील भाज्या खरेदी करताना ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी आणि शहानूरमिया दर्गा येथील किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. दिवाळीच्या दिवसांत कांदा ७० रुपये किलोवर पोचला असून, लसूण ४०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. लिंबाचे भावही २०० वरून काही प्रमाणात खाली येऊन १६० रुपयांवर स्थिरावले. दुसरीकडे, भेंडी, गाजर, कारले, वाल, गिलके, हिरवी मिरची आणि सिमला मिरची यांसारख्या भाज्यांसाठी किलोमागे ८० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना गरजेपुरताच भाजीपाला खरेदी करण्यावर भर द्यावा लागत आहे.
---
बटाट्याचे भाव तुलनेने स्थिर
बाजारात बटाट्याचे भाव तुलनेने स्थिर असून, ते २५ ते ३० रुपये किलोने मिळत आहेत. मात्र, कांद्याचे भाव ६० ते ७० रुपयांवर पोचले आहेत. टोमॅटो ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. भोपळा ४० वरून ५० रुपये, तर काकडी ५० वरून ६० रुपयांवर पोचली आहे. वांगे ६०, कोबी ४०, तर फ्लॉवर ६० रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे स्वस्त पर्याय म्हणून बटाटा आणि कोबीला ग्राहकांची पसंती मिळत आहे, अशी माहिती औरंगपुरा भाजीमंडईतील विक्रेते संजय वाघमारे यांनी दिली.
---
लसूण, अद्रकीने ओलांडली दोनशेची पातळी
मसाल्याच्या पदार्थांमध्ये रोजच्या वापरातील लसूण आणि आले महागले आहेत. लसूण २५० ते ४०० रुपये, तर आले २०० रुपये किलोने विकले जात आहे. शेवगा १०० ते १२०, श्रावण घेवडा १२०, दिलपसंद १००, तर दोडके ८० रुपये किलोने मिळत आहेत.
---
भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो)
बटाटे - २५ ते ३० रुपये
कांदा - ६० ते ७० रुपये
भोपळा - ५० रुपये
काकडी - ६० रुपये
टोमॅटो - ४० ते ५० रुपये
वांगे - ६० रुपये
भेंडी - ८० रुपये
गाजर - ८० रुपये
कारले - ८० रुपये
कोबी - ४० रुपये
फ्लॉवर - ६० रुपये
वाल - ८० रुपये
गिलके - ८० रुपये
हिरवी मिरची - ८० रुपये
सिमला मिरची - ८० रुपये
दिलपसंद - १०० रुपये
लिंबू - १६० रुपये
दोडके - ८० रुपये
शेवगा - १०० ते १२० रुपये
आले - २०० रुपये
लसूण - २५० ते ४०० रुपये
श्रावण घेवडा (बीन्स) - १२० रुपये