भाजीपाल्याची आवक मुबलक, भावात स्थिरता
काही भाज्यांच्या भावात १० ते २० रुपयांची घट; मेथीसह सर्व पालेभाज्यांची जुडी १५ रुपयांना
छत्रपती संभाजीनगर, ता. १ : शहरातील भाजीपाला बाजारात सध्या आवक मुबलक असल्याने बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर आहेत. काही भाज्यांच्या भावात किलोमागे १० ते २० रुपयांची घट झाली. जाधववाडी भाजीमंडईतील ठोक बाजारात टोमॅटो, भोपळा, कोबी, फ्लॉवर, वांगे आणि काकडीची आवक वाढल्याने किरकोळ बाजारात भावात काहीशी घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. सध्या कांदा, लिंबू, लसूण, शेवगा यांना अधिकचा भाव मिळत असल्याने आहे.
औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडीसह शहरातील किरकोळ बाजारात सध्या बटाटे ३० रुपये किलो, तर कांदा ६० रुपये किलो भावाने विकला जात आहे. भोपळ्याचे भाव ६० रुपयांवरून ४० रुपये, काकडी ६० वरून ५० रुपये, टोमॅटो ५० वरून ४० रुपये किलो झाले आहेत. वांग्याचे भाव ८० वरून ६० रुपये, कोबी ६० वरून ४० रुपये, तर फ्लॉवर ८० वरून ६० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. अद्रकही २४० रुपयांवरून २०० रुपये किलो झाली आहे. दुसरीकडे भेंडी, गाजर, कारले, वाल, गिलके, हिरवी मिरची, सिमला मिरची आणि दोडके प्रत्येकी ८० रुपये किलो भावाने मिळत आहेत. दिलपसंद १०० रुपये, शेवगा आणि श्रावण घेवडा १२० रुपये, तर कंटुले २०० रुपये किलो आहेत. लिंबाचे भाव २०० रुपये किलो असून, लसणाला २०० ते ४०० रुपये किलोचा भाव मिळत आहे.
----
पालेभाज्यांची आवक मुबलक
बाजारात पालेभाज्यांची आवक काहीशी वाढली असून, त्यामुळे भावही स्थिर आहेत. मेथी, चुका, पालक, तांदुळजा आणि शेपू या पालेभाज्या १५ रुपये जुडी, तर कोथिंबीर २० रुपये जुडीने विकली जात आहे. आवक मुबलक असल्याने पालेभाज्यांचे भावही स्थिर आहेत. एकूणच भाजीपाल्याच्या बाजारात भाव स्थिर असून, काही भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
----
* भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो)
बटाटे - ३० रुपये
कांदा - ६० रुपये
भोपळा - ४० रुपये
काकडी - ५० रुपये
टोमॅटो - ४० रुपये
वांगे - ६० रुपये
भेंडी - ८० रुपये
गाजर - ८० रुपये
कारले - ८० रुपये
कोबी - ४० रुपये
फ्लॉवर - ६० रुपये
वाल - ८० रुपये
गिलके - ८० रुपये
हिरवी मिरची - ८० रुपये
सिमला मिरची - ८० रुपये
दिलपसंद - १०० रुपये
लिंबू - २०० रुपये
दोडके - ८० रुपये
शेवगा - १२० रुपये
अद्रक - २०० रुपये
लसूण - २०० ते ४०० रुपये
श्रावण घेवडा (बीन्स) - १२० रुपये
कंटुले - २०० रुपये.