नावाला शहरालगत, अवस्था खेड्यागत
-----
सुविधांसाठी ग्रामीण भागावर अवलंबित्व; १६ वसाहतींत पाणीटंचाई, खराब रस्त्यांचाही त्रास
-----
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २६ : शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना शहरालगत नव्या वसाहतींत नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. महापालिका हद्दीला लागून असलेल्या, मात्र ग्रामीण क्षेत्रात गणल्या जाणाऱ्या १६ नागरी वसाहतींत पाणीटंचाई, खराब रस्ते आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराजवळ राहूनही नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने या वसाहतींतील नागरिकांची अवस्था ‘ना शहरात, ना खेड्यात’ अशी झाली आहे.
शहरातील रोजगार, शिक्षण, व्यापार, अन्य सुविधांच्या जवळ राहता यावे या अपेक्षेने अनेक कुटुंबांनी शहरालगत वसाहतींमध्ये घरे घेतली. अनेक ठिकाणी बांधकामे पूर्ण होऊन लोकवस्तीही वाढली आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी निचऱ्याच्या सुविधांचा विकास झालेला नाही. त्यामुळे नव्या वसाहतींमधील रहिवाशांना दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील सर्वाधिक गंभीर समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, घरगुती वापरासाठी पाणी मिळविताना रहिवाशांची दमछाक होत आहे. विशेषतः महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे. अनेक वसाहतींमधील अंतर्गत रस्ते व्यवस्थित विकसित झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असून, धुळीमुळेही रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. रस्ते, नाल्या आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांचा अभाव या भागातील नियोजनातील त्रुटी स्पष्ट करतो.
---
((चौकट))
या आहेत नव्या वसाहती
कारेगाव, पिंगळी, खानापूर, ब्राह्मणगाव परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. परभणी शहरालगत वसमत, गंगाखेड रस्त्याच्या परिसरात नव्या वसाहतींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वसमत रस्त्यावरील अनेक कॉलन्या कारेगाव, पिंगळी आणि खानापूर परिसरात वसल्या असून, गंगाखेड रस्त्यावर ब्राह्मणगाव परिसरातही नव्या वसाहती विकसित झाल्या आहेत.
-----
नागरिकांचा समस्यांशी लढा
शहरातील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, अन्य सुविधांच्या जवळ राहण्याच्या अपेक्षेने नागरिकांनी या भागांना पसंती दिली मात्र लोकवस्ती वाढत असताना पाणीपुरवठा, रस्ते, इतर मूलभूत सुविधांचा अपेक्षित विकास झालेला नसल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरालगत या वसाहतींचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
---
((चौकट)))
जबाबदारी निश्चित करण्याची गरज
महापालिका हद्दीला लागून असूनही या वसाहती ग्रामीण क्षेत्रात येत असल्याने विकासकामांची जबाबदारी, निधी उपलब्धतेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. संबंधित ग्रामपंचायती, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून या भागांचा सर्वेक्षणात्मक आढावा घेणे आवश्यक आहे. लोकसंख्या, पाणीपुरवठा, रस्त्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.
---
((चौकट)))
रस्ते, पाण्याची सोय कधी?
घरासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करून स्थायिक झालेल्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शहराचा विस्तार होत असताना या १६ वसाहतींच्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाणीटंचाई दूर करणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.