छत्रपती संभाजीनगर

जळकोटमध्ये बांध-बंदिस्ती योजना राबवा !

CD
कृषी विभागाने बांध-बंदिस्ती योजना राबविण्याची मागणी ----- जळकोट, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यात भूजलपातळी घटल्यामुळे शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी शेतातच अडवून जमिनीत मुरविण्यासाठी कृषी विभागाने तालुक्यात बांध-बंदिस्ती योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतातील पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत जिरविण्यासाठी बांध-बंदिस्ती उपयुक्त ठरते. यामुळे जमिनीची धूप रोखण्यासह जमिनीतील ओलावा टिकविण्यास आणि भूजलपातळी वाढविण्यास मदत होते. पावसाचा खंड पडल्यास पिकांना उपलब्ध ओलाव्याचा काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता, स्वतःच्या खर्चाने शेतात बांध-बंदिस्ती करणे शक्य होत नाही. त्यामुळे कृषी विभागाने योजनेची माहिती गावागावांत पोहोचवावी, पात्र शेतकऱ्यांची निवड करून शासनाच्या नियमानुसार आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यावे, तसेच तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष पाहणीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बांध-बंदिस्ती, पाणी अडविणे आणि जमिनीत पाणी जिरविणे यांसारख्या उपाययोजनांमुळे शेतीतील ओलावा टिकविण्यास आणि जलसंधारणाला चालना देण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळग्रस्त भागांत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नागेश्वरी केंद्रे, शांताबाई आदावळे, धर्मपाल देवशेट्टे, पंचायत समिती सभापती सुनीता कोसंबे, उपसभापती प्रा. डॉ. माधवराव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सचिन केंद्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, मेहताब बेग आणि सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील नामवाड, आशिष पाटील, अक्षय बडगीरे यांनी केली आहे.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT