जिल्हा मुख्यालयातून...
---
पाणी बचतीसाठी हवा पुढाकार
जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी वर्षभर पुरविण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यातच देशात टँकरचा फेरा सुरु झाला आहे. टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र, प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
- गौरव जोशी
एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी मॉन्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाचा खंडही अधिक होता. परिणामी जो काही पाऊस झाला त्यातून धरणे भरण्यास मदत झाली. परंतु, खरीप हंगाम पूर्णतः करपल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. तसेच मर्यादित पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामही संकटात सापडणार असल्याने येत्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यासोबत जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे संकटदेखील ‘आ’ वासून उभे ठाकणार आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पर्जन्यामुळे धरणे भरण्यास मदत झाली. मात्र, तरीही ऐन ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्यात टँकरचा फेरा सुरु झाला आहे. सद्यःस्थितीत मालेगाव व येवला तालुक्यातील ५५ गावे-वाड्यांना १५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातून ३८ हजारांच्या आसपास जनतेची तहान भागतेय. पण येत्या काळात उन्हाचा वाढता कडका व गावोगावचे मर्यादित पाणीसाठे विचारात घेता पुढील वर्षापर्यंत जिल्ह्याची सारी भिस्त टँकरवरच अवलंबून असणार आहे. जिल्ह्यात सन २०१८-१९ च्या दुष्काळात ३९० हून अधिक टँकर सुरु होतेे. तसेच सन २०२३ मधील अपुऱ्या पर्जन्यामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. त्यावेळी तेराशेहून अधिक गावे-वाड्यांना ४०२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, सन २०१८-१९ तसेच २०२३ पेक्षा यंदाची परिस्थिती अधिक भयावह आहे. सरकारने दुष्काळ निवारणासाठी आतापासूनच पावले उचलली आहेत. धरणांमधील उपलब्ध साठा सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करण्यात आला आहे. आगामी संकट लक्षात घेता शहरी व निमशहरी भागांत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तुर्तास कपातीच्या संकटातून जिल्हा दूर असला तरी येत्या काळात परिस्थितीनूसार किमान १० टक्के किंवा अधिक पाणीकपात केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाणीकपातीला तोंड देण्यासाठी आतापासून मानसिकता तयार करणे आवश्यक आहे.
पाणी हेच जीवन आहे. त्याचा जपून वापरासाठी विविध पातळ्यांवरून वेळोवेळी समाजात जनजागृतीही केली जाते. पण, यंदाची दुष्काळी परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. परिणामी शासन व प्रशासनाच्या पातळीवर पाण्याच्या जपून वापरासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, सध्याचे संकट हे केवळ शासन किंवा प्रशासनाच्या पातळीपुरते मर्यादित नाही. या संकटावर मात करण्यासाठी सर्वसामान्यांनीही पुढे येत जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरता पाण्याचा वापर करणे, उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन करताना इमारती, आस्थापना तसेच उद्योग क्षेत्रातून पाण्याच्या पुनर्वापरासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. किमान प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास येऊ घातलेल्या संकटाची दाहकता नियंत्रणात आणणे शक्य आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.