नो टेन्शन, उद्योगांची तहान भागणार!
---
जायकवाडीत पुरेसा साठा ः वाळूजला ३२, तर शेंद्रा-जालन्याला १८ एमएलडी पाणी
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : यंदा पाऊस कमी आहे. पण, नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात चांगला पाणीसाठा असल्याने वाळूज आणि शेंद्रा, बीडकीन औद्योगिक वसाहतींना सध्या पाणीटंचाईची चिंता भासणार नाही. वाळूज औद्योगिक क्षेत्राला सध्या
रोज सुमारे ३२ एमएलडी, तर शेंद्रा-जालना योजनेतून सध्या १८ एमएलडी पाणी दिले जात आहे. भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन वाळूजसाठी १४४ एमएलडी क्षमतेची नवीन १,८०० एमएमची जलवाहिनी टाकण्यात येणार असून, या कामासाठी २८६ कोटी रुपयांच्या निविदेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती एमआयडीसीने दिली.
वाळूज औद्योगिक क्षेत्राची सध्याची पाण्याची गरज ३० एमएलडी आहे. निवासी भागासाठी आठ एमएलडी तर परिसरातील ग्रामपंचायतींना गरजेनुसार पाणीपुरवठा केला जातो. वाळूज परिसरातील १७ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा या व्यवस्थेशी संबंधित आहे. टँकरचा वापर सुरू झाल्यास उपलब्ध क्षमतेवर परिणाम होऊन औद्योगिक पाणीपुरवठा काही प्रमाणात कमी करावा लागू शकतो.
---
शेंद्रा-जालना योजनेत ५४ एमएलडी क्षमता
शेंद्रा-जालना ही ७२ एमएलडी क्षमतेची योजना आहे. मात्र, सध्या केवळ २८ एमएलडी पाण्याचा वापर होत आहे. या योजनेसाठी सध्या ३६ एमएलडी पंपिंगची व्यवस्था करण्यात आली. भविष्यात मागणी वाढल्यास क्षमता वाढवणे शक्य आहे. शेंद्रा आणि जालना परिसराला प्रत्येकी आठ एमएलडी पाणी दिले जाते. डीएमआयसी शेंद्रासाठीही स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होत आहे.
---
१४४ एमएलडीची नवी जलवाहिनी
वाळूजसाठी सध्या ४० वर्षांपूर्वीची १,०५० एमएम व्यासाची जलवाहिनी वापरली जाते. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन १४४ एमएलडी क्षमतेची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामाच्या निविदेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. सुमारे २८६ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत १,८०० एमएम व्यासाची नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे. पैठण-ब्रह्मगाव ते वाळूज असा २३ किलोमीटरचा हा जलवाहिनी मार्ग आहे. पाणीसाठवण क्षमतेत अडचण नसून मुख्य भर जलवाहिनी बदलण्यावर आहे. नवीन योजनेत भविष्यातील वाढती औद्योगिक मागणी, आरापूर परिसरातील प्रस्तावित विकास, वैजापूरपर्यंत पाणी नेण्याचे नियोजन आणि सिडकोसाठी २० एमएलडी पाणी यांचा विचार करण्यात आला.
---
स्वतंत्र दर नाही
औद्योगिक क्षेत्रात पाणीवाटप उद्योगाच्या प्रकारानुसार स्वतंत्रपणे केले जात नाही. सर्व प्रकारचे उद्योग एकाच क्षेत्रात मिश्र स्वरूपात असल्याने प्रत्येक उद्योगाचा वापर मीटरच्या नोंदीनुसार निश्चित केला जातो. वाळूज आणि शेंद्रा भागासाठी पाण्याचा दर १८.७५ रुपये प्रति हजार लिटर आहे. चिकलठाणा आणि छत्रपती संभाजीनगर परिसरासाठी हा दर २१.७५ रुपये प्रति हजार लिटर आहे.
---
(((कोट)))
जायकवाडीतील उपलब्ध पाण्यामुळे सध्या एमआयडीसीला पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, बाहेरील पाण्याची मागणी वाढून टँकर भरण्याची वेळ आली, तर निश्चित क्षमतेमुळे औद्योगिक पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
- के.एम. चाटे, उपअभियंता, एमआयडीसी
----
अशी आहे पाणी वापराची स्थिती
-----
क्षेत्र ः मागणी ः पुरवठा
---------
वाळूज औद्योगिक क्षेत्र ः ३० एमएलडी ः ३० एमएलडी
वाळूज निवासी क्षेत्र ः ८ एमएलडी ः ८ एमएलडी
वाळूज सिडको महानगर ः ७ एमएलडी ः ५ एमएलडी
वाळूज आऊटसाइड सोसायटी ः २ एमएलडी ः २ एमएलडी
१७ ग्रामपंचायती ः १० एमएलडी ः १० एमएलडी
चिकलठाणा एमआयडीसी ः १० एमएलडी ः ८ एमएलडी
छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी ः दीड एमएलडी ः दीड एमएलडी
शेंद्रा एमआयडीसी ः ८ एमएलडी ः ८ एमएलडी
जालना एमआयडीसी ः ८ एमएलडी ः ८ एमएलडी
डीएमआयसी बीडकीन ः ४ एमएलडी ः ४ एमएलडी
या परिसरातील ग्रामपंचायती ः १ एमएलडी ः १ एमएलडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.