Why is the leopard different among predatory animals know details in marathi Sakal
छत्रपती संभाजीनगर

Leopard : हिंस्र प्राण्यांमध्ये बिबट्या वेगळा का?

बिबट्या अतिशय चतुर, चाणाक्ष, चपळ असतो. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तो कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बिबट्या अतिशय चतुर, चाणाक्ष, चपळ असतो. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तो कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा आहे. म्हणूनच वाघ, सिंहापेक्षा त्याचा जगण्याचा ‘सक्सेस रेट’ वाढलाय. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, उसाची शेती. या शेतीलाही बिबट्याने आपल्या अधिवासात सामावून घेतले आहे!

नांदेड येथील प्राण्यांचे अभ्यासक आणि मानद वन्यजीवरक्षक अतिंद्र कत्ती यांनी बिबट्याचे काही वेगळे पैलू सांगितले. त्यानुसार बिबट्या काहीही खाऊन राहू शकतो. काहीही म्हणजे, वगार, वासरू, बकरी, कुत्रा, डुक्कर वगैरे. परिस्थितीनुसार कुत्रा त्याचे सर्वांत आवडते खाद्य बनलंय.

त्यानंतर क्रमांक लागतो डुकराचा. या दोघांच्या आशेने तो शहराजवळ येतो. अर्थात त्याच्या अधिवासावर माणसाचे झालेले अतिक्रमणही कारणीभूत आहेच! बिबट्या माणसाला खात नाही. दोन पाय असलेला जिवंत ऑब्जेक्ट त्याचे भक्ष्य नाही.

तो माणसावर हल्ला करतो तो स्वरक्षणासाठी. दोघेही अचानक समोरासमोर आले, तर असा प्रकार घडतो. पहिल्यांदा तो चेतवतो, त्यामुळे आपण घाबरतो, मग आपण हालचाल केली, की तो हल्ला करतो. माणूस आणि आपले भक्ष्य यात तो गल्लत करीत नाही.

भक्ष्य ओळखण्याचे सेंसर निसर्गतःच त्याला मिळालेले असतात. आपल्यापेक्षा त्याचे डोळे दहापट ‘स्ट्राँग’ असतात, निशाचर असल्याने रात्रीचे ‘व्हिजन क्लिअर’ असते. बिबट्या झाडावर चपळतेने चढतो. वाघ मात्र काही अंतरच चढू शकतो. आपल्याकडील बिबट्याचे वजन साधारणतः ३० ते ६० किलोपर्यंत असते. याच्या ७५ टक्के वजनाची शिकार पाठीवर घेऊन तो झाडावर चढू शकतो किंवा अर्धा ते एक किलोमीटरवर नेऊ शकतो!

प्रत्येकाचे असते एक स्वतंत्र ‘राज्य’

प्रत्येक बिबट्याची टेरिटरी असते. टेरिटरी म्हणजे त्याचे एकप्रकारे राज्यच! ते २५ चौरस मैल असू शकते. तिथे दुसरा बिबट्या येत नाही. आपल्या ‘राज्या’ची त्याला पूर्ण माहिती असते. जनावरे कुठे बांधलेली आहेत, कुत्रे, डुकरे कुठे फिरतात, याची इत्थंभूत माहिती त्याला असते! जर पहिला बिबट्या त्याच्या टेरिटरीत फिरला नाही, तर दुसरा त्यावर अतिक्रमण करायला लागतो.

म्हणून पहिल्या बिबट्याला सतत फिरून आपली उपस्थिती दाखवावीच लागते. अर्थात यासाठी ‘यूरिन मार्किंग’सारख्या खाणाखुणा तो सोडत असतो. आज इथे तर उद्या तिथे दिसतो. सहवासाच्या काळापुरते नर व मादी बिबट एकत्र येतात. मादी बच्च्यांना पहिले तीन महिने बाहेर काढत नाही. आठ ते नऊ महिन्यांनंतर सोबत नेते. पहिल्यांदा शिकार कशी करतात, याचे प्रात्यक्षिक दाखवते. नंतर तो प्रत्यक्ष शिकार करतो.

एकाच दिवसात भक्ष्य पूर्ण फस्त करीत नाही

बिबट्या हा समूहाने राहणारा नाही. तो स्वतंत्रपणे, लपून-छपून शिकार करणारा आहे. सिंह, लांडगे मात्र समूहाने घेरून शिकार करतात. शिकारीआधी तीन-तीन तास तो न हलता, डुलता संथपणे राहू शकतो. आजूबाजूला असला तरी दिसत नाही.

पायाचाही आवाज येणार नाही, याची काळजी तो घेतो. समजा बिबट्याने कुत्र्याची शिकार केली, तर एकदम तो पूर्ण कुत्रा खात नाही. पहिल्या दिवशी दोन-चार किलो मांसच खातो. दुसऱ्या दिवशी पूर्ण फस्त करतो. त्यानंतर पाच ते सहा दिवस बारीक-सारीक शिकारीवर तो चांगला जगू शकतो. तो रक्त पीत नाही.

श्वास बंद करण्यासाठी गळा धरतो. बिबट्याची नखं त्याची शस्त्र असतात. ती एरवी पंजाच्या आत असतात. वाघ, बिबट्या आदी हिंस्र प्राणी आपली नखं फक्त शिकारीच्या वेळीच बाहेर काढतात. मोठ्या उंचीच्या प्राण्यांच्या वाटेला तो जात नाही. वाघ शिकार केल्यानंतर शिकारीवरच बसलेला असतो. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करतो.

वाघाने बिबट्याला मारल्याच्या घटनाही आहेत. बिबट्या माणसाला टाळायचा प्रयत्न करतो. ‘मिसअंडरस्टॅंडिंग’मुळे असा हल्ला होतो. जिवाची भीती वाटली तरच तो हल्ला करतो. बिबट्या, वाघ हे ‘मॅन इटर’ कधीतरीच होतात. खूपच म्हातारा झालेला असेल, नखे गळालेली असतील, अधाशी असेल तरच तो नाइलाजाने माणसाचे मांस खातो.

  • दोन पाय असलेला जिवंत ‘ऑब्जेक्ट’ त्याचे भक्ष्य नाही

  • भक्ष्य ओळखण्याचे सेंसर निसर्गतःच त्याला असतात

  • आपल्यापेक्षा त्याचे डोळे दहापट ‘स्ट्राँग’ असतात

  • स्वतःच्या वजनापेक्षा ७५ टक्के वजनाची शिकार झाडावर नेऊ शकतो

  • बिबट्या रक्त पीत नाही, नखे फक्त शिकारीवेळीच बाहेर काढतो

  • जनावरे, कुत्री, डुकरे कुठे आहेत, याची इत्थंभूत असते माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT