वाळूजमधील विप्रोचा प्रकल्प
१० डिसेंबरपासून होणार बंद
--
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : एलईडी तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पारंपरिक प्रकाश उपकरणांच्या मागणीत झालेली घट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे विप्रो एंटरप्रायझेसने वाळूज येथील प्रकल्प १० डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाचे कामकाज सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य राहिले नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एलईडी तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या स्वीकारामुळे प्रकाश उपकरणांच्या बाजारपेठेत मोठे बदल झाले. परिणामी, वाळूज प्रकल्पात तयार होणाऱ्या पारंपरिक प्रकाश उपकरणांच्या मागणीत सातत्याने घट झाली. त्याचवेळी कच्च्या मालासह इतर उत्पादनासाठी लागणाऱ्या घटकांचा खर्च आणि कामकाजावरील खर्च वाढल्याने प्रकल्पाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत प्रकल्पाचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी कंपनीने विविध पर्यायांचा विचार केला आणि ते अंमलात आणण्याचे प्रयत्नही केले. मात्र, बाजारातील बदल आणि आर्थिक व्यवहार्यतेचा सर्वंकष विचार केल्यानंतर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. या निर्णयाचा कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या परिणामांची कंपनीला जाणीव असल्याचेही निवेदनात म्हटले असून, प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांत दिलेल्या योगदानाबद्दल कंपनीने आभार मानले आहेत. प्रकल्प बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कर्मचारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी योग्य संवाद व समन्वय साधण्यात येईल. तसेच लागू कायद्यानुसार सर्व कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.