मेन पान १
--
आम्ही जायचं कुठं?
---
महिलांचा प्रवास अन् स्वच्छतागृहांचा ‘वनवास’!
पेट्रोल पंपांवर कुलूप, टोलनाक्यांवर अस्वच्छता; सुविधांअभावी प्रवासात पाणीही टाळतात
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ ः महिला प्रवाशांसाठी प्रवास जितका महत्त्वाचा, तितकीच वाटेत स्वच्छतागृहाची सोय ही मूलभूत गरज आहे. मात्र, शहराबाहेर पडताच या सोयीअभावी मोठी कुचंबणा होत आहे. महामार्ग व राज्य मार्गांवरील पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृहांना कुलूप, तर टोलनाक्यांवरील स्वच्छतागृहांत पाणी, स्वच्छता आणि प्रकाशाचा अभाव असल्याने महिलांना नाईलाजाने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिलांसमोर ‘आम्ही जायचं कुठं?’, हा प्रश्न कायमचाच आहे. धक्कादायक म्हणजे स्वच्छतागृहाची खात्री नसल्याने अनेक महिला प्रवासादरम्यान पाणी पिणेही टाळत आहेत.
लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अधिकारी, महिला लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील खासगी बस वाहतूकदारांची बैठक झाली. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांच्यासह जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशा भिसे, काँग्रेस पक्षाच्या प्रतोद सोनाली थोरमोटे, सदस्या उषा पाटील, दीपाली आदमाने आदी उपस्थित होत्या. या बैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी महामार्गांवरील, राज्य मार्गावरील पेट्रोल पंप, टोलनाके अशा महत्त्वाच्या ठिकाणी पुरेशी व स्वच्छ स्वच्छतागृहे असावीत, असा मुद्दा मांडण्यात आला.
दिवसा आणि रात्रीच्या वेळी खासगी बस किंवा एसटी बस प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची मोठी अडचण होते. प्रवासादरम्यान गाडी थांबल्यानंतर महिला प्रवाशांना लघुशंकेसाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळणे आवश्यक आहे. महिलांना अस्वच्छ ठिकाणी जावे लागल्यामुळे फंगल इन्फेक्शन तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) यांसारख्या गंभीर आजारांचा धोका संभवतो. केवळ स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नसते किंवा ते अस्वच्छ असतात म्हणून लातूरवरून पुणे वा इतर शहरांत शिक्षणासाठी जाणाऱ्या अनेक तरुणी व महिला दुपारपासून पाणी पिणे टाळतात; ही गंभीर बाब आहे, असे महिलांनी सांगितले.
----
पहिली गोष्ट तर महिला या विषयावर बोलत नाहीत. ही समस्या त्या सहन करतात. त्यामुळे अद्यापपर्यंत महिलांच्या स्वच्छतागृहांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. महामार्गावर, राज्य मार्गावर असलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय आहे. काही ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहच नाहीत. त्यामुळे महिलांची, युवतींची मोठी कुचंबणा होते. प्रवासादरम्यान असा अनुभव वारंवार येत असल्याने महिला प्रवासाआधी पाणी पिणे टाळतात, हे किती धक्कादायक आहे. या परिस्थितीची सरकारने दखल घेणे गरजेचे आहे.
- आशा भिसे, गटनेत्या
----
लातूरमधून बस सुटल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आतच लातूर जिल्ह्याची हद्द संपते. बीड, नांदेड, सोलापूर, धाराशिव हे जिल्हे सुरू होतात. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रशासनाने आपापल्या भागातील पंपांवर टोलनाक्यांवर चांगली स्वच्छतागृह पुरवणे गरजेचे आहे. स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह अत्यंत कमी असल्याने गाडी रात्रीच्या वेळी थांबवायची कोठे, असा प्रश्न पडतो. काही पंपचालक डिझेल भरणार असाल, तरच स्वच्छतागृह वापरा असे सांगतात.
- जगदीश स्वामी, अध्यक्ष, खासगी बस संघटना
----
सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये पुरेसे पाणी नसते. पुरेसा प्रकाश नसतो. सोयीसुविधा नसतात. त्यामुळे महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कुठे लावायची, हाही प्रश्न महिलांना पडतो. त्यामुळे स्वच्छतागृहात आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव असतो. त्यामुळे युरीन इन्फेक्शन व अन्य आजारांचा धोका संभवतो. वेस्टर्न टॉयलेटची स्वच्छता न राखल्यानेसुद्धा इन्फेक्शन होते. अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
- डॉ. मनीषा बरमदे, वैद्यकीय तज्ज्ञ
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.