येडशी ः चोरट्यांनी भागवत खोबरे यांच्या घरातील उचकटलेले कपाट.
...............
येडशीकरांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव उधळला
बंद घराचे कुलूप तोडून सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ; तीन ग्रामस्थ जखमी
येडशी, ता. १८ (बातमीदार) : येथील बलवंड गल्लीमध्ये मंगळवारी मध्यरात्री १२ ते साडेबाराच्या सुमारास १० ते १२ सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले. मात्र, ग्रामसुरक्षा ग्रुपवरील सतर्कता आणि ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.
चोरट्यांनी शेतातून गल्लीमध्ये प्रवेश केला. ये-जा करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून चोरट्यांनी कंपाउंडच्या तारा कटरने कापल्या. सुरवातीला बाबू खोबरे यांच्या घराची कडी उघडण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्याने त्यांचा मुलगा ओंकार खोबरे यांना संशय आला. त्यांनी तत्काळ शेजारील साधू कचरे यांना फोन करून माहिती दिली. कचरे यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता १० ते १२ जण शस्त्रांसह उभे असल्याचे दिसले. त्यांनी ओंकार यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, चोरट्यांनी भागवत खोबरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील साहित्याची फेकाफेक केली; मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. दरम्यान, गल्लीमध्ये चोरटे शिरल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बप्पा बलवंड यांनी एका चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने गुप्तीने त्यांच्या हातावर वार केला. तसेच सुनील ऊर्फ सोनू कचरे आणि रफिक पटेल यांना दगड मारून जखमी केले.
..................
((चौकट))
ग्रामसुरक्षा ग्रुपमुळे ग्रामस्थ एकत्र
येडशीतील ग्रामसुरक्षा ग्रुप या घटनेत प्रभावी ठरला. या व्हॉट्सॲप ग्रुपवर ग्रामस्थ, नेतेमंडळी, पोलिस पाटील आणि पोलिस प्रशासन जोडलेले असल्याने घटनेची माहिती मिळताच नागरिक एकत्र आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार माहिती मिळूनही पोलिस पहाटे दोनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उपाययोजनांसाठी बैठक बोलावण्यात आली आहे.
...................
फोटो क्रमांक ः OSM26B07413
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.