बीड: कोरोना विषाणू महामारीने जिल्हा त्रस्त आहे. रुग्णालयांत ॲडमिट करुन घेतले जात नाही, रेमडीसीवीर इंजेक्शन भेटत नाही, रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल असल्याचे वास्तव आहे. याच काळात माफियागिरी जोरात वाढली आहे. कोरोनाच्या काळातील ठेकेदारीआड आड शासन तिजोरीवर डल्ला आणि दुसरीकडे अवैध धंदे व विशेषत: वाळू माफियांनी हैदोस मांडला आहे. याला कोणाचे पाठबळ आहे की शासन - प्रशासन यंत्रणा शंढ झाल्याचे लक्षण हे लोकांनीच ठरवावे. अशी परिस्थिती असताना आता आजी - माजी पालकमंत्र्यांनी ऐकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे.
कोरोनात राजकारण सुरु असले तरी दोघांनीही एकमेकांच्या वर्मी घाव घातले आहेत. माजी पालकमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी या माफियागीरीवर बोट ठेवत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहले आहेत. हा घाव वर्मी बसल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही ‘अनेक महिने विश्रांतीनंतर जाग आली की बाहेरच्या गोष्टींची माहितीच नसते’ असा वॉर पंकजा मुंडेंवर केला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला आणि उपाय योजनांसाठी शासनाने तिजोरीची कवाडे उघडताच आरोग्य यंत्रणेतील उपकरणे, डागडुजी, पुरवठा अशी कामे मिळविण्यासाठी सत्तापक्षातील ठेकेदार मंडळींची झुंबड उडाली. त्यांच्यासाठी ही महामारी जणू इष्टापत्तीच ठरली. कोण्या मंडळींनी कोणत्या गोष्टींचे ठेके घेतले, किंमती कशा अनेक पटींनी लावल्या, नको असलेली कामे कशी प्राधान्याने केली हे जिल्ह्याला माहितच आहे. सत्ताधारी मंडळी आपत्तीतून अशी इष्टापत्ती साधत असताना विरोधीपक्ष मात्र मुग गिळून तर गप्प असण्यामागचे इंगितही गुपित आहे.
हा प्रकार कमी की काय म्हणून आता वाळू माफियांनीही डोके वर काढले आहे. माजलगाव, गेवराईतील काही वाळू ठेक्यांचे लिलाव झाले असले तरी क्षमतेपक्षा अधिक उपसा व वाहतूक सर्रास सुरु आहे. बीड शहरातून जाणारा अंबिका चौकातील रस्ता जणू वाळू चोरांसाठीच केला की काय, असा प्रश्न आहे. इकडे पोहनेर, साकूड या भागातही वाळू वाहतूक व उपशात कोणाची मक्तेदारी हे लोक उघड बोलत आहेत. आता वाळू चोरी म्हणजे व्हॉईट कॉलर आणि विशेषत: राजकीय पक्षातील बड्या मंडळींचा पांढरा धंदा झाला आहे.
पण, आता कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेल जिल्ह्यात रोज हजारांवर रुग्ण आढळत आहे. मृत्युची साखळी सुरुच आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनची साठेबाजी, तुटवडा आणि जादा दराने विक्रीचे प्रकार सर्रास सुरु आहेत. लोकांना बेड मिळायला तयार नाही. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. दरम्यान, माफियागीरीवरुन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत चोरांना संरक्षण आणि माफियांचे राज्य असा टोला लगावला.
दुसऱ्या दिवशीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं असा सवाल केला. पालकमंत्र्यांना केवळ माफियांचे हित माहितीय असाही हल्ला चढविला. या हल्ल्याला धनंजय मुंडे यांनीही तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले. कोव्हॅक्सिनचे जिल्ह्यात १३ हजारांवर डोस शिल्लक असल्याचे सांगत अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर अचानक जाग आल्याने अनेक गोष्टी बदललेल्या दिसतात असा हल्लाही त्यांनी चढविला.
पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लोकांच्या जीवन मरणाच्या या कठीण काळात राजकारण करू नये असा सल्लाही द्यायला धनंजय मुंडे विसरले नाहीत. लसींबाबत काहींना ज्ञात नसेल, असा खोचक टोला लगावला आहे. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही धनंजय मुंडे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात.
मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रांवर एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावरही पंकजांनी टोला लगावत शरद पवारांनाही पत्र लिहीन पण त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा, असा सल्ला पंकजांनी दिला आहे.
(बातमीदार- दत्ता देशमूख)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.