Beed News : जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाची सुरवात समाधानकारक झाली आहे. मात्र, तरी अजूनही अपेक्षित प्रमाणात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जलसाठे अद्यापही कोरडेच आहेत.
या परिस्थितीत ग्रामीणसह शहरी भागातील देखील पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता साडेतीनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसाने शेतकरी सुखावला आणि खरीप पेरणीची लगबग सुरू झाली. या पावसावर शेतकरी आपली पेरणी पूर्ण करत आहेत.
परंतु मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे. पाऊस काळ कमी झाल्याने जलसाठ्यामध्ये वाढ झाली नाही. परिणामी या वर्षी जानेवारीमध्येच जलसाठ्यांनी तळ गाठला. जिल्ह्यात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाळा सुरू होऊन १५ दिवस उलटले आहेत. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या २८.२० मिमी पावसाची नोंद झाली. सुरवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणीची चिंता मिटली. परंतु पाणीटंचाईचे मोठे संकट अजूनही जिल्ह्यावर घोंगावत आहे. जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ३५० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, जलसाठे भरण्यासाठी जिल्हा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या, परंतु जलसाठे अद्यापही कोरडेच आहेत. जिल्ह्यातील ३०० गावे आणि २८८ वाड्यांना ३४७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ४६५ गावांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी ८१४ बोअर आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
बीड- १३५.३ मिमी, पाटोदा -१९३, आष्टी- १७५.४, गेवराई- १९०, माजलगाव - १४७.४, अंबाजोगाई -१६९.५, केज -१३९.४, परळी-१३९, धारूर- १६८.१, वडवणी -१०६.३, शिरूर कासार - १५९.५ अशा प्रकारे पावसाची नोंद असून, जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीच्या सरासरी २८.२० टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाची समाधानकारक नोंद असून असाच पाऊस पुढील काही दिवस राहावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.