कळमनुरी ः चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडून देण्याचा मोबदला म्हणून तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी व त्याच्या हस्तकाला सोमवारी दुपारी चार वाजता कळमनुरी येथे (ता.आठ) लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वाळू उपसा करून विक्री करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यांनी पकडल्यानंतर ट्रॅक्टर सोडून देण्याचा मोबदला म्हणून संबंधितांकडे त्यांनी पैशाची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा लावला.सोमवारी बसस्थानक परिसरात असलेल्या एका स्वीट मार्टमध्ये तीस हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यासोबत त्याच्या हस्तकालाही ताब्यात घेतले. ही कारवाई लातूर विभागाच्या अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफुने, कर्मचारी विजय उपरे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, विनोद देशमुख, प्रमोद थोरात यांनी सोमवारी (ता.चार) दुपारी चारच्या सुमारास मंडळ अधिकाऱ्याला तीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. पैसे स्वीकारल्यानंतर त्याने पैसे मोजावयास दिलेल्या सुनील शिंदे या हस्तकालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
गुन्हा मागे घेत नसल्याच्या कारणावरून मारहाण
कुरुंदा ः कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुनुना येथे गुन्हा मागे घेत नसल्याच्या कारणावरून महिला व तिच्या मुलीस मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात सोमवारी (ता. आठ) गुन्हा दाखल झाला. वसमत तालुक्यातील जुनुना येथील फिर्यादी महिलेस रविवारी (ता. सात) सायंकाळी सहा वाजता सुनील शिंदे, अनिल शिंदे व अन्य दोघांनी संगणमत करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच अनिल शिंदे याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. या वेळी फिर्यादीची मुलगी भांडण सोडवायला आली असता तिलापण मारहाण व केस मागे घेतली नाही तर तुला खतम करून टाकतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या बाबत सोमवारी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. इंगोले तपास करीत आहेत.
मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार
हिंगोली ः तालुक्यातील कोथळज येथील दिलीप घुगे यांना मोबाइलवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बासंबा पोलिस ठाण्यात रविवारी (ता. सात) करण्यात आली. या बाबत दिलेल्या अर्जात म्हटले आहे, रविवारी सकाळी आठ वाजता एका अनोखळी नंबरवरून फोन आला. मी हॅलो म्हटले असता समोरच्या व्यक्तीने ‘तू कुठे आहेस, तू हिंगोलीला ये, तुला खतमच करून टाकतो’ असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. तेव्हा मी त्याला आपण कोण बोलता, असे विचारले असता व माझे काय चुकले आपण मला धमक्या का देता, असे म्हटले असता ‘तू फक्त हिंगोलीत भेट, मग तुला सांगतो’ अशा प्रकारे बोलून मला जीवे मारण्याची धमकी दिली. परत फोन केला असता समोरची व्यक्ती स्वतःचे नाव सांगत नसून फोन कट करीत आहे. तरी सदरील व्यक्तीचा शोध घेऊन कडक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे श्री. घुगे यांनी बांसबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे ऑनलाइन कवी संमेलन
पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळप्रकरणी एकावर गुन्हा
हिंगोली ः तालुक्यातील अंधारवाडी येथील क्वारंटाइन सेंटरवर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. आठ) गुन्हा दाखल झाला. अंधारवाडी येथील आदिवासी वसतिगृहामध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये अंधारवाडी येथील अर्जुन भोस हा रविवारी रात्री येथे आला. त्याने क्वारंटाइन सेंटरसमोरच ठाण मांडले. त्यानंतर तोंडाला मास्क न लावता क्वारंटाइन सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी लखन ठाकूर यांनी त्यास बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्याने ठाकूर यांनाच शिवीगाळ केली. या प्रकरणी ठाकूर यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याची छाती दुखत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.