लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत अत्याधुनिक ऑटोमॅटिक आरएनए एक्स्ट्रॅक्शन मशीन दाखल झाली आहे. यामुळे कोरोनाच्या स्वॅबचा अहवाल देण्याच्या कामात अधिक अचूकता येणार असून स्वॅबचा अहवाल केवळ तीन ते चार तासांत येणार आहे. गुरुवारपासून (ता.१४) ही मशीन कार्यान्वित होईल, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. ठाकूर म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संस्थेत चोवीस तास तपासणीची सुविधा देण्यात आली होती. आता सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत ही सुविधा सुरू ठेवण्यात येणार असली तरी अत्यावश्यक वेळी इतर कालावधीत ती सुरू राहणार आहे. आतापर्यंत साडेसात हजार लोकांची तपासणी करण्यात आली. टाळेबंदीमध्ये अडकलेल्या पाच हजार जणांना गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे. संस्थेतील प्रयोगशाळेत दोन दिवसांपूर्वी अत्याधुनिक ऑटोमॅटिक आरएनए मशीन दाखल झाली आहे.
पूर्वी स्वॅबमधील आरएनए कृत्रिमरीत्या वेगळा करावा लागत होता. आता नव्या यंत्रामुळे आरएनए ऑटोमॅटिक वेगळा होईल. यामुळे स्वॅब तपासणीचा वेग वाढणार आहे. सध्या प्रयोगशाळेत रोज ९२ स्वॅबची तपासणी केली जात होती. आता यंत्रामुळे रोज १६० स्वॅबची तपासणी करणे शक्य होणार आहे. पूर्वीच्या पद्धतीतही अहवालात अचूकता होती. आता यंत्रामुळे अहवालात अधिक अचूकता येणार आहे. यंत्रामुळे केवळ तीन ते चार तासांत स्वॅबचा अहवाल देणे शक्य होणार आहे, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेसाठी होल्डिंग एरिया
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संस्थेत होणाऱ्या विविध आजारांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होऊ लागली. खासगी रुग्णालयात खर्च करून शस्त्रक्रिया करून घेणे त्यांना शक्य नव्हते. यामुळे संस्थेत खास शस्त्रक्रियांसाठी होल्डिंग एरिया स्थापन करण्यात आला असून या क्षेत्रात शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शस्त्रक्रिया आता होणार आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित रुग्णांचा स्वॅब घेण्यात येणार असून तो निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.