Aurangabad
Aurangabad 
मराठवाडा

खुलताबादेतील दर्ग्याने उघडला सातशे वर्षांच्या इतिहासाचा पेटारा 

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद : सूफी संतांचे दक्षिणेतील महत्त्वाचे शहर असलेल्या खुलताबादेतील सुमारे सातशे वर्षे जुन्या हजरत ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन गरीब यांच्या दर्ग्यातील अनेक अमौलिक पुराणवस्तूंचा ठेवा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. यात चांदी, पंचधातूची भांडी, शमादान, अखंड दगडी साखळ्या, सुवर्णाक्षरांत लिहिलेल्या कुराणाच्या प्रतींबरोबरच मुघलकालीन तोफेचाही समावेश आहे. 

कोण आहेत ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन? 
चिश्‍ती परंपरेतील 21वे ख्वाजा आणि दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन यांचे उत्तराधिकारी हजरत ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन गरीब यांचा खुलताबाद शहरात भव्य दर्गा आहे. चौदाव्या शतकात बंधू शाह मुन्तजाबुद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या दौलताबाद येथे झालेल्या निधनानंतर, बुऱ्हाणुद्दीन यांना तब्बल 1400 अनुयायांसह दख्खनेत सूफी पंथाचा प्रसार करण्यासाठी पाठवण्यात आले. सुलतान मुहम्मद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीहून दौलताबादला आणली, तेव्हाचा हा काळ. सुरवातीच्या काळात दौलताबादेत मुक्काम ठोकलेले बुऱ्हाणुद्दीन नंतर खुलताबादेत स्थिरावले. तेथेच 1344 साली त्यांचे निधन झाले. खान्देशातील फारुकी सुलतानांनी 1399 साली आसिरगढ जिंकल्यानंतर आपल्या या गुरूच्या नावाने बुऱ्हाणपूर शहर वसवले. त्यांचेच शिष्य आणि चिश्‍ती परंपरेतील 22वे ख्वाजा जैनुद्दीन शिराजी यांनीही येथूनच सूफी पंथाची धुरा हाकली. दोघांचेही दर्गे समोरासमोर आहेत. 

अखंड दगडी साखळ्या आणि मुघलकालीन तोफही 
ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन गरीब यांच्या दर्ग्याच्या ऐसपैस प्रांगणात भव्य नगारखाना, सराई, मशीद, मदरसा आहे. निजाम उल मुल्क आसफजाह, त्याचा मुलगा नासिर जंग यांच्यासह मध्यकाळातील अनेक महत्त्वाच्या लोकांच्या कबरी आहेत. प्रेषित महंमद पैगंबरांच्या दाढीचा केसही येथे जतन करून ठेवलेला आहे. नक्षीदार धातूच्या पत्र्यांनी वेष्टित दरवाजे लक्ष वेधून घेतात. याच ठिकाणी ख्वाजांची शिसवी काठी, त्यांचे प्रवचनाचे लाकडी पीठ, चांदीची हंडी, कबरीच्या चादरीवर ठेवण्याचे दगडी आणि बिदरी मुतक्के, समया, शमादाने, अखंड दगडात कोरलेल्या साखळ्या अशा अनेक वस्तू येथे आहेत. 

दर्गा कमिटीचा पुढाकार 
सातशे वर्षांपासून वेगवेगळ्या काळातील अनेक वस्तू दर्ग्यात जतन करून ठेवलेल्या होत्या. दर्गा कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अबू मोहम्मद यांनी पुढाकार घेत, हा सर्व ठेवा नागरिक आणि पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्याचे ठरवले. दर्ग्यातील एका सराईवजा भागातच या सर्व पुराणवस्तू शोकेस करून सुरक्षितरित्या प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. खुलताबादचा इतिहास उलगडण्यासाठी हा ठेवा महत्त्वाचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT