लातूर : कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांवरील उपचार कालावधीत आमूलाग्र बदल झाले आहेत. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला चौदा दिवसांऐवजी आता दहा दिवसांनंतर रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. नव्या बदलानुसार बुधवारी (ता.१३) उदगीरच्या चार कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. याच पद्धतीने उर्वरित तेरा रुग्णांना दहा दिवसांनंतर आठ दिवसांत सुटी मिळू शकते. त्यानंतर नवीन रुग्ण आला नाही तर जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊ शकतो, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यावेळी उपस्थित होते. कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांवरील उपचार कालावधी आणि त्यांच्या स्वॅब घेण्याच्या निकषात सरकारने बदल केले आहेत. संशयित रुग्णांचा स्वॅब घेण्यावर नव्या निकषामुळे खूप मर्यादा आल्या आहेत. उपचार व स्वॅबबाबत रुग्णांची वर्गवारी करण्यात आली आहे.
पहिल्या वर्गवारीत सौम्य लक्षणांच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी तपासणी करून लक्षणे दिसून न आल्यास रुग्णांचा स्वॅब न घेता त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्गवारीत मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचीही सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप तसेच श्वसन क्षमतेबाबत तपासणी करून लक्षणे दिसून न आल्यास घरी पाठवण्यात येणार आहे. तिसऱ्या वर्गवारीत एचआयव्ही पॉझिटिव्ह, किडनीचे आजार, कमी प्रतिकारशक्ती, कर्करोग आदी गंभीर आजाराच्या रुग्णांचा स्वॅब घेण्यात येणार असून तो निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉ. ढगे यांनी सांगितले. नव्या निकषानुसार बुधवारी उदगीरच्या चार कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे उदगीरमधील ग्रीन झोनची संख्या तीनवरून दोनवर आली आहे. राहिलेल्या तेरा रुग्णांपैकी १५ मे रोजी सहा, १७ मे रोजी एक, १९ मे रोजी पाच तर शेवटी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला २० मे रोजी रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता डॉ. ढगे यांनी व्यक्त केली.
उदगीरचे आणखी चार रूग्ण कोरोनामुक्त, फुलांनी स्वागत करुन सोडले घरी
दहा दिवस खूप महत्त्वाचे
बदलत्या निकषामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत नवा रुग्ण आढळून न आल्यास जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर येऊन जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये येऊ शकतो. यासाठी लातूकरांना पावलापावलावर काळजी घ्यावी लागणार आहे. सरकारने परवानगी दिल्यामुळे पुणे, मुंबई व अन्य ठिकाणांवरून लोक लातुरात येत आहेत. यामुळे येणारे दहा दिवस खूप महत्त्वाचे आहेत. बाहेरून आलेल्यांनी घराबाहेर पडू नये. घरातील आजारी; तसेच ज्येष्ठ लोकांपासून अंतर ठेवून राहावे लागणार आहे. बाहेरून आलेल्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. प्रत्येकजण सतर्क राहिला तरच जिल्हा कोरोनामुक्त होईल व राहील, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.