कन्नड : कन्नड तालुका १ नोव्हेंबर १९५६ साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आताच्या कन्नड तालुक्यातील बरीच गावे चाळीसगाव तालुक्यातील ब्रिटीश राजवटीत होती. ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या सर्व गावातील मराठा समाज हा कुणबी म्हणजेच ओबीसी आहे, असा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना केला.
कन्नड तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी विजय ठाकुरवाड गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना श्री किशोर पवार यांनी पुराव्यानिशी निवेदन दिले. त्याअनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ब्रिटीशकालीन दस्तावेजानुसार कन्नड तालुक्यातील मराठा समाज हा कुणबी आहे.
या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे पवार यांनी तहसील कार्यालयात सोमवारी सादर केले. छत्रपती संभाजीनगर शहराच्या गॅझेटमधील चॅप्टर नं.१ मधील संदर्भ लक्षात घेता ब्रिटीश राजवटीतील १६ मैला पर्यंतची गावे समाविष्ठ करण्यात आलेली आहेत.
तसेच कालेलकर आयोग, मंडल आयोग जे की ओबीसी (इमाव) आरक्षणा संदर्भात केंद्रीय सरकारने नेमलेले होते. त्यांनी ठरवून दिलेले तत्व व मार्गदर्शक मुल्यांना अपेक्षित सर्व आवश्यक बाबी हया भागातील रहिवास करत असलेला मराठा कुणबी समाज पूर्ण करतो.
त्या बाबींचा विचार करता शिंदे समितीच्या चौकशीची देखील येथील समाजास गरज नसावी कारण सन १९५६ पासून खान्देश भागातील मराठा समाज कुणबी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा गॅझेटनुसार चॅप्टर नं १. पान नं. १५ पॅरा नं. ३ मधील उल्लेखानुसार सातमाळा पर्वत रांगेपासून दक्षिणेकडील १६ मैला पर्यंत असलेली ब्रिटीश टेरीटरीतील गावे शोधून सन १९५६ पूर्वी खानदेश विभागात असल्याचे चिन्हांकित करुन त्यांना ओबीसी (इमाव) चा लाभ देण्यात यावा.
असे नमूद असल्याने कन्नड - सोयगाव तालुक्यातील मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण सरकारला द्यावेच लागेल त्यामुळे कन्नड तालुक्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष पवार यांनी राज्य सरकारला तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याकडे केली.
१९५६ पूर्वीचे पुरावे असलेली गावे
कन्नड तालुक्यातील उत्तरेकडील खान्देश विभागात सन १९५६ पूर्वीचे पुरावे असलेली गावे - चिकलठाण, हतनूर, रेल, नरसिंगपूर, मक्रणपूर, चापानेर, जळगांव घाट, जामडी घाट, वडाळी, बोरसर खुर्द, नागद, बेलखेडा, हसनाबाद, वडगांव, पांगरा सायगव्हाण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.