लातूर ः शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या बिदर जिल्हा बांबू उत्पादक संघातर्फे बीदर जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकात बांबू लागवड करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पाशा पटेल यांनी बांबू लागवड व त्यापासून उत्पादित होणाऱ्या चळवळीचे केंद्र लोदगा येथे उभारले आहे. त्याच पद्धतीने कर्नाटकातही बांबू चळवळ गतिमान करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतला आहे.
मेहकर येथील मठाचे राजेश्वर स्वामी, केंद्रीयमंत्री भगवंत खुब्बा यांचे ज्येष्ठ बंधू गणपतराव खुब्बा, प्रशांत होळसमुद्रकर, सत्यवान पाटील, येसाजी पाटील, संजू प्रभा, गोविंद बिरादार, अरुण पाटील, बंटी नायक, दयानंद पाटील, सागर माका, मल्लप्पा दाना यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोदगा येथे भेट देऊन बांबू चळवळीविषयी माहिती घेतली. बांबू लागवड, टिशू कल्चर लॅब, बांबूपासून तयार केले जाणारे फर्निचर याबाबत या शिष्टमंडळाने संपूर्ण माहिती घेतली. राजेश्वर स्वामी व गणपतराव खुब्बा यांनी पहिल्या टप्प्यात २५ हजार बांबू लागवड करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. पूर्ण कर्नाटकात बांबू लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांबूची लागवड, जोपासना या संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन द्यावे तसेच फर्निचर तयार करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांनी केली. फर्निचर निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ५० मुलांना लोदगा येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे २०५० सालापर्यंत मुंबई शहर तसेच बांगलादेश व श्रीलंका यासारखे देश पाण्याखाली बुडण्याची भीती आहे. इंग्लंड सारखा देश पूर्णपणे बर्फाखाली गाढला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे प्रकार होऊ नयेत यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गतीने वाढणारे, २४ तास ऑक्सिजन देणारे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करणारे बांबूचे झाड लावले पाहिजे. आपण मठाच्या पूर्ण शेतीमध्ये बांबू लागवड करणार आहोत. संपूर्ण कर्नाटक राज्यात बांबू लागवड करण्यात येईल, असे मत स्वामीजींनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.