लातूर : लातूर शहरात अनधिकृत बांधकामांना नोटीस देणे, संबंधितांना बोलावून घेऊन स्टेलमेंट करणे असे प्रकार सुरू आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच दलाली संस्कृती वाढली आहे. याला पालकमंत्री, महापौर आणि आयुक्त जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे सभागृह नेता ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी मंगळवारी (ता. ३१) महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी स्थायी समितीचे सभापती ॲड. दीपक मठपती उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसात शहरातील फक्त ७५ डॉक्टरांना अनधिकृत बांधकामाच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. एका डॉक्टरला तर सव्वा दोन कोटीची नोटीस देण्यात आली आहे. आम्हाला भेटा रक्कम कमी करून देतो म्हणून काही दलाल काम करीत आहेत. वास्तविक पाहता या नोटीसच चुकीच्या आहेत. पण यातून ‘वसुली’ सुरू करण्यात आली आहे. याला पालकमंत्री, महापौर व आयुक्त जबाबदार आहेत. राज्य सरकारच्या वसुलीसाठी वाझे तर महापालिकेत वसुलीसाठी वाझे कोण आहेत हे आता समोर येत आहे, असा आरोपही श्री. गोजमगुंडे यांनी केला.
काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करात बारा टक्केची सूट जाहीर केली. लातूरकरांना आमिष दाखवले. तो ठराव शासनाने विखंडित केला. गाळेधारकाचे भाडे कमी करा म्हणून विद्यमान पालकमंत्री व तत्कालीन आमदारांनी मोर्चा काढला. पण आता आम्ही ठरवलेल्या भाड्या पेक्षा जास्त भाडे आकारावे असे शासनानेच सांगितले आहे. सत्ताधारी काँग्रेसने केवळ लातूरकरांची फसवणूक केली आहे. बारा टक्केची सूट लातूरकरांकडून वसूल न करता पालकमंत्री व महापौरांनीच भरावी, अशी मागणी त्यांनी केली.
रेणापूर नाका ते गरुड चौक या रिंगरोडच्या कामाची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. पण भारतीय जनता पक्षाला याचे श्रेय जाते म्हणून सत्ताधाऱ्यांकडून कामच सुरू केले जात नाही. पालकमंत्र्यांनी या कामाचे श्रेय घ्यावे पण काम सुरू करून लातूरकरांना दिलासा द्यावा, असे ॲड. मठपती म्हणाले. विद्यमान पालकमंत्र्यांच्या काळात एक पैसाही महापालिकेला आला नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी शैलेश स्वामी, संजय रंदाळे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष देतो आयुक्तांना आदेश
पालकमंत्री व महापौरांचे जमत नाही हे जगजाहीर आहे. त्यामुळे कामांना मंजुरीच दिली जात नाही. या दोघांच्या वादात शहराचा विकास खुंटला आहे. महापौरांऐवजी आता पक्षाचा शहराध्यक्ष कामाच्या संदर्भात आयुक्तांना आदेश देत आहे. ही नवीन संस्कृती महापालिकेत सुरू झाल्याचा आरोपही श्री. गोजमगुंडे यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.