फोटो
फोटो 
मराठवाडा

कोरोनामुळे लॉकडाऊन : अस्वस्थ प्रश्नांची मालिका 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : चीनमधील वुहान प्रांतातून सुरुवात झालेल्या कोरोना या विषाणूच्या साथीने अतिशय अल्प कालावधीत जगातील जवळ जवळ सर्वच देशातील प्रांतात आपले हातपाय पसरले आहेत. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने अमेरिका, इटली, स्पेन, इराण, फ्रांस व इंग्लंड यासारख्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशांना दररोज हजारोंच्या संख्येने तयार होणारे नवीन रुग्ण व मृत्यूमुखी पडणारे नागरिक ही अवस्था हताश व असहाय्यपणे पाहण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नाही. 

जागतिक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास वेळीच सुरुवात करूनही आज आपल्या देशातही इतर देशांसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. कोणताही नफा-तोटा यासारखा व्यावहारिक विचार न करता महाराष्ट्र शासन व केंद्र शासन धीरोदत्तपणे परिस्थितीशी दोन हात करत आहे, परंतु समाजाकडून मिळणारे सहकार्य मात्र अजूनही तोकडेच आहे. ‘मला काय त्याचे’ अशी बेफिकीर व निर्ढावलेली वृत्ती अद्यापही दूर झालेली दिसत नाही. याचे दु:ख वाटते. 

भारतीय समाजमन अस्वस्थ 

कोरोना विषाणू संक्रमणाच्या साथीमुळे भारतीय समाजव्यवस्थेतील भीषण वास्तवही प्रकट होत आहे. जेमतेम आर्थिक विकासदर असल्यामुळे लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान आपल्याला परवडणारे नसूनही आपण तो पर्याय स्वीकारला आहे, कारण लोकशाही शासनव्यवस्थेत आर्थिक बाबीपेक्षा आरोग्य व्यवस्था ही प्राध्यान्यक्रमात वरच्या स्तरावर असणे अपेक्षितच असते. यापुढील काळात घसरणीनंतर अर्थव्यवस्था कोणत्या स्तरावर थांबेल याबाबत कोणताही अर्थतज्ज्ञ आज भाकीत करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे अनेक दूरगामी परिणामी संपूर्ण व्यवस्थेवर निश्चितच होणार आहेत. यामुळे संपूर्ण भारतीय समाजमन अस्वस्थ आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, धार्मिक विविधता असलेल्या देशात प्रत्येकजण आपले सामाजिक भान व उत्तरदायित्व, जबाबदारी ओळखून वागला तरच  परिस्थितीत सुधारणा होणे शक्य होईल.

पुरेशी व्यवस्था नसलेला वर्ग यामध्ये सर्वात जास्त भरडला जात आहे
 
कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन केले तरी त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दाहक वास्तव दर्शवणाऱ्या आहेत. दररोज काम करून उदरनिर्वाह करणारा मजूर-कामगार वर्ग, बेकार - बेरोजगार व दोनवेळेच्या जेवणाचीही पुरेशी व्यवस्था नसलेला वर्ग यामध्ये सर्वात जास्त भरडला जात आहे. घराच्या ओढीने अनेक लोकांचे जत्थेच्या जत्थे ४०० ते ५०० किलोमीटरचे अंतर तोडून मिळेल त्या वाटेने व मार्गाने जीवाची तमा न करता मार्गक्रमण करत आहेत, चालत आहेत. आपल्या मुलांबाळाची होत असलेली उपासमार सहन न झाल्याने त्यांच्यासह आत्महत्या करणारी माता या घटना मनाला चटका लावणाऱ्या आहेतच. 

मदत छावण्याच्या आधारावर जगत आहेत

महाराष्ट्र व इतर अनेक राज्यात स्थलांतराचे प्रमाण प्रचंड आहे. रोजगाराच्या संधीच्या शोधात गेलेले शेकडो मजूर विविध ठिकाणी अडकून पडलेले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्यसरकार, स्वयंसेवी संस्थासह अनेक दानशूर व्यक्तींनी सुरु केलेल्या मदत छावण्याच्या आधारावर ते आलेले दिवस काढत आहेत. परंतु ही व्यवस्था तोकडी व कामचलाऊ असते, हे मान्य करावेच लागते. यापेक्षा गंभीर प्रश्न आहे तो स्वतःच्या व मुलांच्या भवितव्याचा. आज अनेक लहान सहान उद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत सर्वच रोजगार पुरवणारे उद्योग बंद आहेत. अनेक तोट्यातील उद्योग पुन्हा उभे राहतील याची शाश्वती वाटत नाही.

शेतीक्षेत्रही यापासून अलिप्त नाही

शेतीक्षेत्रही यापासून अलिप्त नाही. पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी राज्यात शेतीतील जवळजवळ सर्व हंगाम वाया गेले आहेत. हातातोंडाशी आलेल्या रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके कोरोना संक्रमणामुळे व अवकाळी पाऊस अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कामाशियाय मजूर बसून आहेत तर काढणीविना फळे, भाजीपाला व अन्नधान्य इत्यादी पिकांची होत असलेली नासाडी पहावत नाही.  यामुळे  सर्व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहेच. 
(लेखक ः शिवाजी कराळे, राज्यशास्त्र विषयातील संशोधक विद्यार्थी, मुखेड, जिल्हा नांदेड.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT