political party
political party esakal
मराठवाडा

मराठवाड्यात ‘कॉँटे की टक्कर...’

दयानंद माने

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दै.सकाळने मतदारांची कलचाचणी घेतली. त्या कलचाचणीचे निष्कर्ष हाती आले आहेत.

आज निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्षाची (भाजप) ताकद थोडीशी वाढणार आहे. तर शिवसेनेची आहे ती कायम राहील. मात्र भाजपच्या वाढीचा फटका आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व इतर पक्षांना बसू शकतो. मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण जागा ४६ आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्यास कुणाला किती जागा मिळतील, अशी पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनुसार भाजपला सहा जागांचा फायदा होत आहे. भाजप सध्याच्या १६ जागेवरून २२ पर्यंत पोहोचू शकतो. तर आघाडीतील प्रमुख अशा शिवसेनेला २०१९ च्या निवडणुकीत १२ जागी यश मिळाले होते. ते या पाहणीतही तेवढेच राहिले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला नुकसान नाही. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आठ जागा होत्या त्या तीनने कमी होऊन पाचवर येतील. कॉँग्रेसच्या जागा आठवरून सातवर येतील, असा कल हाती आला आहे. तर शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या जागा गमावतील.

या निकालाचे राजकीय आकलन खालील मुद्याद्वारे करता येईल. २०१९ साली सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला वगळून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर ही आघाडी अजून नीट एकजीव बनू शकलेली नाही परिणानी ती मतदारांची मने जिंकू शकलेली नाही. दुसरीकडे आघाडीचा प्रमुख विरोधक भाजप मात्र विविध आंदोलने करुन स्थानिक नेतृत्व व पक्षाचा मासबेस टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.

शिवसेनेची कोंडी...

सत्ताधारी आघाडीतील शिवसेना हा मराठवाड्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी या पारंपरिक पक्षांसाठी तरूण व नवा जोडीदार असला तरी आकडेमोडीत मराठवाड्यात तरी तो या दोन पक्षांचा ‘मोठा भाऊ’ आहे. या पाहणीतही त्याने आपली जागा कायम ठेवली आहे. मात्र या मोठ्या भावाला (शिवसेनेला) आपल्या दोन छोट्या भावांना (कॉँग्रेस व राष्ट्रवादी) बळ देता आलेले नाही. त्याचे कारण हे तिन्ही पक्ष लोकांच्या समोर आघाडी सरकारचे योगदान एकत्रितपणे पोहोचवू शकलेले नाहीत. कोविडचा वर्ष ते दीड वर्षाचा कालखंड, केंद्राशी विविध मुद्द्यावरून वाढलेला संघर्ष, अतिवृष्टीसारख्या घटना यामुळेही सत्ताधारी आघाडीची कोंडी झालेली आहे. त्याचा परिणाम कामकाजावर झाला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी व उस्मानाबाद वगळता इतर जिल्ह्यांत शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही. तिथे तिच्या मित्रपक्षांचे अस्तित्व आहे. तिथे ते त्यांना मान द्यायला तयार नाहीत. चंद्रकांत खैरे (चार वेळा खासदार), खा. संजय जाधव (तीन वेळा परभणीचे खासदार), खा. हेमंत पाटील (हिंगोली), अर्जून खोतकर (जालना), खा. ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार आदी मंडळी शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. विद्यमान आमदार सर्वश्री संजय सिरसाट (औरंगाबाद पश्चिम), अंबादास दानवे, कैलास पाटील (उस्मानाबाद), ज्ञानदेव चौगुले (उमरगा), तानाजी सावंत (परंडा), डॉ. राहूल पाटील (परभणी) आदींनी आपल्या मतदारसंघात व विधानसभेतही चांगली कामे केली आहेत. ते भविष्यात पक्षाचा चेहरा होऊ शकतात. हिंदुत्ववादी भाजपशी असलेली अनेक वर्षांची नैसर्गिक युती तोडून अचानकपणे कॉँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा करणार्या शिवसेनेकडे आज सत्तेच्या चाव्या असल्या तरी ही नवी युती अनेक पारंपरिक मतदारांना रूचलेली नाही, तिचे प्रतिबिंबही या पाहणीत पडल्याचे दिसत आहे.

कॉँग्रेसचे वैभव लयाला...

एकेकाळी मराठवाड्याने राज्यातील कॉँग्रेसला (कै.) शंकरराव चव्हाण, (कै.) विलासराव देशमुख, (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर व अशोक चव्हाण यांच्या रूपाने चार मुख्यमंत्री दिले आहेत. त्या कॉँग्रेसकडे सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सोडले तर मोठा नेता उरला नाही. त्यांचा प्रभावही केवळ नांदेड जिल्ह्यात उरला आहे. मुंबई नागपूर या समृध्दी महामार्गाला जोडणारा जालना नांदेड या जोडमहामार्ग, इतर विकास कामांना अशोक चव्हाणांनी मंजुरी दिली. तर देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा आपला खुंटा मजबूत करून घेतला आहे. मात्र त्यांनी इतर घटक पक्ष संपवले आहेत. परिणामी सत्तेच्या बळावर नांदेड जिल्ह्यात कॉँग्रेसला ‘अच्छे दिन’ आलेले या पाहणीत दिसून आले आहे. लातूरसारखा एकेकाळचा बालेकिल्ला मात्र या पाहणीत कॉँग्रेसच्या दृष्टीने खचल्याचे दिसत आहे. या जिल्ह्याला (कै) विलासराव देशमुख, माजी लोकसभा सभापती शिवराज पाटील चाकूरकर, (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर आदी दिग्गज नेते लाभले. तिथे हा पक्ष केवळ लातूर शहर व तालुक्यापुरता मर्यादित बनला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना अजूनही वडिलांसारखे राज्य व विभागात आपले नेतृत्व सिध्द करता आलेले नाही. अशोक चव्हाण व नंतर अमित देशमुख यांच्या रूपाने कॉँग्रेसला मराठवाड्यात चेहरा मिळू शकेल, अशी आशा कॉँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत होती. मात्र ती आशा अजूनतरी फलद्रूप झालेली नाही.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांनी अद्याप या शहरातील पक्ष संघटनेकडे, निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने लक्ष दिलेले नाही. एकेकाळी सत्तेचे नेतृत्व करणारा हा गांधीवादी पक्ष शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाशी घरोबा करतो, हे पारंपरिक मतदारांना पटलेले दिसत नाही. या पक्षाकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख हे मंत्रीद्वय वगळता इतर आमदार फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. भविष्यात मात्र कॉँग्रेसला तरूण नेतृत्वाचा प्रश्नही सोडवावा लागणार आहे.

भाजपची एकट्याने घोडदौड...

(कै.) प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या शिवसेना भाजपच्या युतीच्या शिल्पकारांचा मराठवाडा हा प्रदेश. मात्र ही युती आता इतिहासजमा झाली आहे. हे दोन्ही नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे आदी नेत्यांच्या बळावर आजचा मराठवाड्यातील भाजप उभा आहे. शिवसेनेने तीस वर्षांपासूनची साथ सोडल्यानंतर व दिग्गज नेते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर नवनेतृत्वाला नव्या राजकीय समीकरणांचे नेतृत्व करावे लागत आहे. सकाळच्या पाहणीत औरंगाबाद, बीड, लातूर व जालना या चार जिल्ह्यात भाजप मुसंडी मारेल असे चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात गेल्या दोन वर्षांत सत्तेचा अतिरेक वाटावा, अशा काही घटना घडल्या. तसेच जिल्ह्यात पालकमंत्री म्हणूनही ठोस काम करून दाखविता न आल्याने राष्ट्रवादीतही त्यांच्याविषयी नाराजीची भावना आहे. शिवाय गटबाजी आहे. याचा फायदा या जिल्ह्यात भाजपला मिळताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रशांत बंब, आ.अतुल सावे, लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. राणाजगजितसिंह पाटील यांचाही आपापल्या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे. जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व बबनराव लोणीकर आपले अस्तित्व टिकवून राहतील. भाजपची अनेक नेतेमंडळी पत्रकार परिषदा, विविध आंदोलने यांद्वारे रस्त्यावर दिसत आहेत.

राष्ट्रवादीची पीछेहाट...

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद), (कै.) अंकुशराव टोपे (जालना), कमलकिशोर कदम (नांदेड), (कै.) साहेबराव पाटील डोणगावकर, सूर्यकांता पाटील या एकेकाळच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांच्या कोणत्याही राजकीय प्रवाहांना मराठवाड्यात मोठे केले. मराठवाड्याने शरद पवारांना फार मोठी ताकद दिली होती. त्यांच्या समाजवादी कॉँग्रेसचे कॉँग्रेसमध्ये विलिनीकरणही औरंगाबादेतच झाले होते. नंतर मात्र प्रत्येकच जिल्ह्यात पवारांना मानणारे जुने कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेले. काहीनी पवारांची साथ सोडली. सध्याच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे मात्र मराठवाड्यात नेतृत्व करू शकेल असे नेतृत्व नाही. सकाळच्या पाहणीत राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत आठ जागा मिळविलेल्या या पक्षाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागत आहे. बीड जिल्ह्यात चार जागा मिळविलेल्या या पक्षाला पाहणीत केवळ एक किंवा दोन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. धनंजय मुंडे व राजेश टोपे यांना आपल्या जिल्ह्यातही पक्षाला चांगले दिवस दाखवता येणार नाहीत, असे चित्र आहे. सत्तेच्या अतिरेकाने परळीत केलेल्या काही घटनांनी त्यांच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. तर राजेश टोपे यांना आरोग्यमंत्री मंत्री म्हणून राज्यपातळीवर चांगले काम करून दाखविले असले तरी जिल्ह्यात व विभागात त्यांनी पक्षासाठी फार कष्ट केलेले दिसत नाहीत. परिणामी जालन्यात भाजप वाढत आहे. राष्ट्रवादीच्या उल्लेखनीय आमदारांत धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे या मंत्री महोदयासोबत राजू नवघरे, संदीप क्षीरसागर या तरूण आमदारांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांत विविध कारणांनी धुसफूस आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना वरचढ असल्याने ते इतर मित्रपक्षांना दुय्यम स्थान देते. नव्याने उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडी व एमआयएम या पक्षांनीही दलित मतदारांची व्होटबॅँक फोडल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद क्षीण होत आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेड, परभणी या मतदारसंघात केवळ वंचितच्या उमेदवारांमुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव झाला. तर औरंगाबादची जागा वंचित आघाडीतील एमआयएमने जिंकली सुध्दा. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेतही वंचितच्या उमेदवारांमुळेच आघाडीच्या मतबॅँकेला खिंडार पडल्याने त्यांची सत्ता गेली होती. नंतर मात्र वंचित व एमआयएमचा काडीमोड झाल्याने त्यांची ताकद क्षीण झाली आहे. मात्र अनेक मतदारसंघात ते अजूनही कॉँग्रेस व राष्ट्रवादीला जेरीला आणू शकतात. दुसरीकडे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर आदी नेते सतत भाजपच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम देताना व क्रियाशील ठेवताना दिसतात. त्यामुळे आघाडीची वाट बिकट असल्याचे दिसते. तर शिवसेना मात्र भाजपला विरोध करत आपली ताकद राखेल, असे दिसते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था. नगर पंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिका या निवडणुकीत आघाडीतील घटक पक्ष व भाजप यांच्यात ‘कॉँटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT