औरंगाबाद - सलग तीन सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिल्यानंतर नगरसेवक पद रद्द होते. एमआयएमच्या नगरसेविका समिना शेख आणि एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेले वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांनी शुक्रवारी (ता. 22) महापौरांकडे रजेचे अर्ज सादर केले; मात्र अशा प्रकारे रेजेची तरतूद नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी (ता. 23) सांगितले. त्यामुळे दोघांचे पद धोक्यात आले आहे.
एमआयएमने सय्यद मतीन यांची काही महिन्यांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केली आहे; तर समिना शेख या मागील काही सभांपासून सातत्याने गैरहजर आहेत. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत या दोघांनी महापौरांकडे रजेचे अर्ज सादर केले. मतीन यांनी कारागृहात असल्यामुळे सभागृहात हजर राहता येत नसल्याचा दावा केला; तर समिना यांनी आजारी असल्याचे कारण दिले. त्यामुळे महापौरांनी समिना यांचा अर्ज मेडिकल बोर्डाकडे पाठवून देण्याचे आदेश दिले व मतीन यांच्या अर्जावर पोलिसांकडून माहिती घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोघांचीही रजा मंजूर झालेली नाही. हे दोघेही सलग तीन सभांना गैरहजर राहिले आहेत.
कोणताही सदस्य सलग तीन सभांना गैरहजर असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होईल, अशी तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील आहे. त्यामुळे या दोघांचेही नगरसेवकपद धोक्यात आले आहे. दरम्यान, रजा मंजूर करण्याचा कुठलीही तरतूद नियमात नसल्याचे महापौरांनी नमूद केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.