उस्मानाबाद : गोळीबाराची घटना चुकून घडली नसून, हा घातपाताचा प्रकार असल्याची तक्रार मृताच्या पत्नीने दिली आहे. त्यावरून भूम पोलिस ठाण्यात बाबा पटेल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी ही घटना घडली होती.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दस्तगीर जिलानी पटेल ऊर्फ शहानूर व बाबा उस्मान पटेल (दोघे रा. पाटसांगवी, ता. भूम) हे दोघे शनिवारी (ता.२९) दुपारी बाराच्या सुमारास दस्तगीर पटेल यांच्या पाटसांगवी येथील घरासमोर मद्यपान करीत बसले होते. यावेळी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या भांडणाचा राग मनात धरून बाबा पटेल याने पिस्तुलाने गोळी मारून दस्तगीर पटेल यांचा खून केला, अशी तक्रार मृताची पत्नी दिलशाद दस्तगीर पटेल यांनी दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून बाबा पटेल याच्याविरुद्ध भूम पोलिस ठाण्यात रविवारी (ता. एक) गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, बाबा पटेल याने ही घटना पिस्तुलाचे ट्रिगर चुकून दबल्याने गोळी लागून दस्तगीरचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच ही घटना घडल्यानंतर त्याने तातडीने पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी मृताच्या पत्नीने खुनाचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
वाचा : पाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर
सास्तूरमध्ये पाच ठिकाणी घरफोडी
लोहारा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील सास्तूर येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच घरांत चोरी केली. चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. सोमवारी (ता. दोन) सकाळी या घटना उघडकीस आल्या.
सास्तूर येथील मनोहर भीमराव शिंदे, व्यंकट क्षीरसागर, रहेमान शेख, प्रल्हाद कोकणे व भिवाजी कोकणे यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली. सोमवारी (ता. दोन) पहाटे साडेतीनच्या सुमारास मनोहर शिंदे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटे आत घुसले.
झोपेत असलेल्या शिंदे कुटुंबीयांवर चोरट्यांनी गुंगीचे पावडर टाकून कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम काढून घेत असताना शिंदे यांच्या पत्नीला कपाटाचा आवाज झाल्याने जाग आली. चोरट्यांना पाहून त्यांनी आरडाओरड केली. यावेळी त्यांची चोरट्यांसोबत झटापट झाली. मात्र चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची माहिती मनोहर शिंदे यांनी दिली. १७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन, कपडे (साड्या) व रोख रक्कम असा एकूण ६८ हजार ११ रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
गावातील अन्य चारजणांच्या घरांतही चोरट्यांनी डल्ला मारून रोख रक्कम लंपास केली. या घटनेची माहिती सास्तूर येथील औटपोस्ट पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी लोहारा पोलिस ठाण्यात माहिती दिली असता पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उस्मानाबाद येथील श्वानपथक व ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन्ही पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र श्वानपथकाला कुठलाच सुगावा लागला नसल्याचे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी मनोहर शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.