मराठवाडा

अधिकाऱ्यांनी मुलांना लस देऊन केला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

विकास गाढवे

लातूर : सरकारने 2020 पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचा निर्धार करत सोमवारपासून (ता. 27) गोवर रूबेला लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. लसीकरणाबाबत पालकांच्या मनातील नाहक भीती दूर करून त्यांच्या विश्वास जागवण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मुलगी शाश्वती व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी मुलगा आयान यांना लस देऊन जिल्ह्यास्तरीय मोहिमेची सुरवात केली. त्यांचे अनुकरण करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी मुलगी प्रत्यूशा व सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी मुलगी शनया हिचेही लसीकरण करून घेतले.  

अधिकाऱ्यांनी मोहिमेसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे पालकांत लसीकरणाबाबत असलेली भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढीस लागण्याची आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. शासकीय वसाहतीमधील जिल्हा परिषद कन्या शाळेत सोमवारी सकाळी मोहिमेचे उद्घटान झाले. महापौर सुरेश पवार, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजाराम पोवार, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. गोवर व रूबेलामुळे दरवर्षी पन्नास हजार मुलांचा मृत्यू होतो. यामुळे गोवर आजाराचे निर्मूलन व रूबेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने राज्यभरात लसीकरण मोहिम हाती घेतली आहे.

सहा आठवडे चालणाऱ्या या मोहिमेची मागील काही दिवसात व्यापक जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, पूर्वी पोलिओचा डोस देण्यात येत होता तर या मोहिमेत गोवर रूबेलाची लस (इंजेक्शन) देण्यात येत आहे. लसीकरणातील या बदलामुळे पालकांत अनामिक भीती आहे. यातूनच अफवा व निष्फळ चर्चाही घडून येत आहेत. त्याला पायबंद घालून पालकांच्या मनात लसीकरणाबाबत विश्वास जागवण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

स्वतःच्याच मुलांना सर्वात आधी लस देऊन जिल्ह्यात त्यांनी मोहिमेचे उद्घाटन केले. अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात मोहिमेला वेगळेपण मिळाले असून, आरोग्य यंत्रणेलाही मोठे बळ आले आहे. जिल्ह्यात लसीकरणापासून एकही पात्र बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन श्रीकांत यांनी केले.  

मोहिमेच्या उद्घाटनानंतर कन्या शाळेतील मुलींना, संत तुकाराम मॉडेल इंग्लिश स्कूलमधील मुलामुलींना तसेच कारसा व भोईसमुद्रगा (ता. लातूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींना लस देण्यात आली. सर्व ठिकाणी लसीकरणाला उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील नऊ लाख मुलामुलींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. ही लस शंभर टक्के सुरक्षित असून, आपल्या देशात उत्पादित या लसीचा दुसऱ्या देशात पुरवठा होतो. पालकांनी निःसंकोचपणे मुलांचे लसीकरण करावे.

- डॉ. संजय ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT