लातूर : शहरात अत्यल्प पाऊस झाला असतानाही जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहरातील गंजगोलाईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्ड्यांमधून वाट काढत नागरिकांना पुढे जावे लागत आहे. तर अनेक वाहनचालकांना खड्ड्यांमुळे पाठ, मान आणि कंबरदुखीला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांबरोबरच रस्त्यांवर पसरलेली खडी आणि धूळ यांचाही सामना लातूरकरांना करावा लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्ते खड्डेमय होतात; पण यंदा अत्यल्प पावसातही शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेसमोर असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावर (शिवाजी चौक ते पालिका) असंख्य खड्डे पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावर न्यायालयासह अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावर सुरू असते. तरीही हा रस्ता अद्याप दुरुस्त केला गेला नाही. अशीच स्थिती शिवाजी चौकातील उड्डाणपुलाची आणि जुन्या रेल्वेलाइन रस्त्याची आहे. खड्ड्यांतून मार्ग काढत नागरिकांना पुढे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूकही रेंगाळत आहे.
शाहू चौकातून गांधी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर पक्का रस्ता शोधावा लागत आहे. हा रस्ता आधीच खड्डेमय आहे. त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यात धुळीचा सामनाही करावा लागत आहे. शाहू चौकात तर अक्षरश: खडी पसरली आहे. तर काही भागांत खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. तिथून आंबेडकर चौक मार्गे विवेकानंद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांतून वाहन चालवणे अनेकांना कठीण जात आहे. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांना तर चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रिंगरोडवरील बसवेश्वर चौक ते दगडोजी देशमुख चौकादरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झालेले असतानाही अधिकारी-कर्मचारी अद्याप रस्त्यावर उतरले नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डेमय चित्र "जैसे थे' आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने शहरातील रस्त्यांची डागडुजी केली जावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
हे आहेत खड्डेमय रस्ते
- शिवाजी चौक ते महापालिका
- शिवाजी चौकातील उड्डाणपूल
- जुनी रेल्वेलाइन रस्ता
- गंजगोलाई ते शाहू चौक
- शाहू चौक ते जुने बसस्थानक
- आंबेडकर चौक ते विवेकानंद चौक
- बसवेश्वर चौक ते दगडोजी देशमुख चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.