sharad Pawar allegation on jalna violence agitation raged because of non-keeping of word demand judicial inquiry Sakal
मराठवाडा

Jalna Violence : शब्द न पाळल्याने आंदोलन चिघळले; शरद पवार यांचा आरोप, न्यायालयीन चौकशीची मागणी

पवार यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली

सकाळ वृत्तसेवा

अंकुशनगर (जि. जालना) : ‘‘मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेले मनोज जरांगे यांच्याबरोबर एकीकडे मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. पण, दुसरीकडे पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. लाठीमार करण्याचे आदेश ‘वरून’ आल्याचे अधिकारी सांगत आहेत, असे आदेश देणारा शक्तिशाली नेता कोण?,’’

असा प्रश्न करत ‘‘शिंदे सरकारने शब्द न पाळल्याने आंदोलन चिघळले,’’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. 

पवार यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर अंकुशनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘आंदोलन शांततेत सुरू होते. मुख्यमंत्र्यांनी संयमाची भूमिका घेत आंदोलकांबरोबर चर्चा केली.

मात्र, नंतर अचानक काय झाले? पोलिसांचा मोठा फौजफाटा मागवून शांततेत बसलेल्या ग्रामस्थांवर लाठीमार केला गेला. अनेकजण जखमी झाले. आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पसरण्याची भीती आहे. संवेदनशील आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे.’’ या प्रसंगी माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, जयसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते.

पिचड यांचा आदर्श घेणार का?

गोवारी समाजाचे आंदोलन चिघळले होते. त्यावेळी तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्यांचा आदर्श आताचे गृहमंत्री घेणार का? असा प्रश्न पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला.

मुंबईतील बॉँबस्फोटानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी माध्यमांना चुकीची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता, असेही ते म्हणाले.

तरच मराठा समाजाला आरक्षण

‘‘५० टक्क्यांची अट शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य नाही. या विषयावर इंडियाच्या काल झालेल्या बैठकीत चर्चा झाली. संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा मुद्दा मांडला जाईल,’’ असेही पवार म्हणाले.

शुक्रवारी मुंबईत इंडियाची बैठक सुरू होती. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या बैठकीवरील लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीहल्ला केल्याचे अनेकांचे म्हणणे असल्याचा आरोपही या वेळी पवार यांनी केला.

आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न

‘‘या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे. कुठल्याही आंदोलकाने कायदा हातात घेतला नाही. दंगा केला नाही. अशावेळी पोलिस बळाचा वापर करणे योग्य नसते. आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न येथे झाला आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.

‘‘मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. समाजातील मुलांना सवलती मिळाव्या, यासाठी आंदोलने केली. मनोज जरांगे हे आतापर्यंत दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलले आहेत. दुसरीकडे आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस आणले गेले. सरकारशी चर्चा सुरू असताना महिलांवर लाठीहल्ला केला. एवढेच नाही तर, हवेत गोळीबार केल्याचेही कानावर आले.

उदयनराजेंचे कौतुक

‘‘मला एका गोष्टीचा आनंद आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे हे समाजाच्या अडचणीच्या काळात सोबत उभे राहतात,’’ अशा शब्दांत शरद पवार यांनी उदयनराजेंचे कौतुक केले. उपोषणस्थळी आधी उदयनराजे आणि नंतर शरद पवार आले. उंच व्यासपीठामुळे शरद पवार यांची खुर्ची व्यासपीठाच्या खालीच ठेवण्यात आली होती. दोघांनी मिळून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT