लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च - एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 17) दुपारी ऑनलाईन जाहिर झाला. लातूर विभागाचा निकाल 97.27 टक्के लागला असून निकालात विभाग राज्यात तिसरा आहे. विभागात एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 85 टक्के विद्यार्थ्यांनी 60 टक्क्याच्या पुढे गुण घेतले आहेत. ही सामुहिक गुणवत्ताच यंदाच्या विभागाच्या निकालाचे प्रमुख वैशिष्ट्य असून `फर्स्टक्लास`च्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात लातूर विभागाची राज्यात आघाडी आहे, अशी माहिती विभागीय मंडळाचे सचिव व अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.
लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्यांतील मिळवून एक सात हजार 950 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख पाच हजार 890 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख तीन हजार तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात 56 हजार 122 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह 75 टक्क्याच्या पुढे तर 32 हजार 289 विद्यार्थी साठ टक्क्याच्या पुढे गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 45 टक्क्याच्या पुढे द्वितीय श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 हजार 642 तर 35 टक्क्याच्या पुढे उत्तीर्ण श्रेणीतील एक हजार 950 विद्यार्थी आहेत. साठ टक्क्याच्या पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 88 हजार 411 असून एकुण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांचे प्रमाण 85 टक्के आहे. यामुळे या परीक्षेत लातूर विभागाने सामुहिक गुणवत्तेतही यंदा आघाडी घेतली आहे. अन्य विभागाच्या तुलना केली तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांत साठ टक्क्याहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का जास्त आहे. यंदा मंडळाने 15 दिवस उशीराने परीक्षा घेऊनही वेळेत निकाल जाहिर केला. कोरोनामुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर व तीस मिनिटाचा जास्त वेळ देऊन पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा दक्षता समितीने परीक्षेच्या काळात मोलाचे सहकार्य केल्यामुळेच परीक्षा विनातक्रार पार पडली. कॉपीचे गैरप्रकार तुलनेने कमी झाल्याचे विभागीय सचिव व अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्याची आघाडी
या निकालात विभागामध्ये यंदा उस्मानाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली असून जिल्ह्याचा निकाल 97.83 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील 21 हजार 817 पैकी 21 हजार 347 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक असून जिल्ह्याचा निकाल 97.63 टक्के लागला आहे. यात 39 हजार 44 पैकी 38 हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्हा तिसऱ्यास्थानी असून जिल्ह्याचा निकाल 96.68 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या 45 हजार 29 पैकी 43 हजार 535 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
`श्रेणीसुधार`साठी दोनच संधी
दहावी परीक्षेत कमी गुण पडलेले विद्यार्थी पुन्हा वाढीव गुणांसाठी गॅप घेऊन परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने श्रेणी सुधार योजना सुरू केली असून या योजनेत केवळ दोनच परीक्षेची संधी आहे. निकालानंतर येत्या जुलै - ऑगस्ट तसेच मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दोन परीक्षा देता येतील. श्रेणीसुधारसाठी केवळ दोनच परीक्षेची संधी असल्याची माहिती बहुतांश पालक व विद्यार्थ्यांना नाही, असेही श्री. तेलंग यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.