NND12KJP01.jpg
NND12KJP01.jpg 
मराठवाडा

पेरू लागवडीतून शाश्वत उत्पन्न

कृष्णा जोमेगावकर

नांदेड ः देगलूर तालुक्यातील उच्चशिक्षित शेतकरी अनिल पाटील यांनी पीक पद्धतीत बदल करून कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पाच एकरांवर पेरूची लागवड केली असून पहिल्याच हंगामात त्यांना शाश्वत उत्पन्न मिळाले आहे. या भागात शेतकरी विकास गटाच्या माध्यमातून १५० एकरांवर पेरूची लागवड झाली आहे. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून फळपीक घेण्याऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कौतुकाची थाप दिली आहे.

जून २०१८ मध्ये पाच एकरांमध्ये केली पेरूची लागवड

रामपूर येथील अनिल पाटील यांचे शिक्षण एम. फिल, पीएच. डी.पर्यंत झाले आहे. माळेगाव शिवारात शेती त्यांची शेती आहे. यात श्री. पाटील यांनी हळद, आंबा, शेवगा, बटाटा, फुले, भाजीपाला, सीताफळ, लिंबू यासारखी पिके घेतली आहेत. यानंतर त्यांनी फळपिकांत बदल करण्याचा निर्णय घेऊन मागील काही वर्षांपासून बारामती भागातील फळपिकांचा अभ्यास केला. यानंतर त्यांनी जून २०१८ मध्ये पाच एकरांमध्ये पेरूची लागवड केली. शास्त्रोक्त पद्धतीने फळपिकाची जोपासना करून अठरा महिन्यांत पहिला बहार तोडणीला आला. यात त्यांना दीडशे क्विंटल पेरूचे उत्पादन मिळाले. या पेरूला निझामाबाद, हैदराबाद मार्केटमध्ये पन्नास ते ऐंशी रुपये दर मिळाला.

पाच एकरांतून आठ ते दहा लाखांचे उत्पादन

पेरूत आंतरपीक म्हणून सोयाबीनही घेतले. पेरू लागवडीसाठी रोपे व लागवडीचा खर्च येतो. परंतु, या बाबीला अनुदान आहे. पाच एकरांतून पहिल्या बहारात आठ ते दहा लाखांचे उत्पादन मिळाल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. सध्या दुसरा बहार धरल्याने तो मार्चमध्ये काढणीला येईल. या बहाराला अधिक दर मिळेल. फळबाग लागवडीसाठी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

फळपिकाची लागवड करावी ः जिल्हाधिकारी डोंगरे
पेरू लागवडीतून उत्पन्नाचा मार्ग मिळालेल्या अनिल पाटील यांच्या पेरू बागेला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी शेतीमधून निश्चित स्वरूपाच्या उत्पन्नासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपिकाची लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी रविशंकर चलवदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सोनटक्के, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, तहसीलदार अरविंद बोळंगे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

एक हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट
अवर्षणप्रवण असलेल्या देगलूर तालुक्यात कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व महात्मा गांधी रोजगार हमी योजना या तीन योजनांतून जून २०१८ पासून आजपर्यंत १५० एकरवर पेरूची लागवड झाली आहे. अनिल पाटील यांनी व इतर शेतकरी एकत्र येऊन शेतकरी विकास गट स्थापन केला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार
जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत शेतकरी विकास गटामधील शेतकऱ्यांचा नियेाजन भवनात सत्कार केला होता. ग्रुपमधील सदस्य शेतकरी आता पेरू, सीताफळ व लिंबू यासारख्या फळपिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. फळबाग लागवडीचा पथदर्शी प्रकल्प आकार घेत आहे. आजपर्यंत २५० एकरांवर पेरू, सीताफळ व लिंबू लागवड झाली आहे. आगामी काळात एक हजार एकरांवर फळबागांची लागवड करण्याचा निर्णय शेतकरी गटाने घेतल्याचे शिवाजी शिंंदे यांनी सांगितले. पेरू लावगडीत राज्यात देगलूर तालुका अव्वल करण्याचा मानस शेतकरी विकास गटाने घेतल्याचे ते म्हणाले.

फळबाग लागवडीसाठी काय करावे?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत पेरू, सीताफळ, लिंबू, आंबा आदी फळपिकांची लागवड करता येते. यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक आहे. त्याचबरोबर शिफारस केलेल्या कलमांची शासकीय अथवा शासनमान्य खासगी रोपवाटिकेमधून खरेदी करून शिफारशीप्रमाणे मार्च २०२० अखेरपर्यंत लागवड करणे आवश्यक आहे. अर्जासोबत सातबारा, आठ ‘अ’, बँक पासबुक झेराॕक्स, आधारकार्ड झेराॕक्स, हमीपत्र आदी कागदपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतीमधून निश्चित स्वरूपाचे उत्पादन
पारंपरिक पिकांसोबतच शेतीमधून निश्चित स्वरूपाचे उत्पादन मिळावे, यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून फळपिकांची लागवड करावी. यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे.
अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी.

शेतकऱ्यांना फळबाग लागवडसाठी अर्ज करता येतील
कै. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी आॕफलाइन अर्ज करता येतील. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

फळबाग लागवडीसाठी नांदेड जिल्ह्यात वाव
फळबाग लागवडीसाठी पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही नांदेड जिल्ह्यात मोठा वाव आहे. पारंपरिक पिकांना फाटा देऊन आपल्या जमिनीत कमी पाण्यात येणारे पेरू फळपिकाची लागवड शेतकऱ्यांनी करावी.
अनिल पाटील, पेरू उत्पादक शेतकरी, रामपूर, ता. देगलूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT