नांदेड - महापालिकेसमोर सध्या तीन महिन्यात दोनशे कोटींहून अधिक कराचा डोंगर वसूल करण्याचे आव्हान आहे. चालू वर्षाची कराची मागणी आणि मागील थकबाकीचा आकडा तब्बल दोनशे कोटींहून अधिक झाला आहे. शास्ती माफीसाठी मालमत्ताधारकांना ता. ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
नांदेड महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी मालमत्ता विभागाची नुकतीच आढावा बैठक घेतली. या वेळी सहा क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यालयीन व्यवस्थापक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. मालमत्ताधारकांना कराच्या थकबाकीवरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करून एक महिना ता. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र क्षेत्रीय अधिकारी, मालमत्ता विभागाचे वसुली लिपिक, पर्यवेक्षक यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करून वसुली करावी, अशा सूचना उपायुक्त संधू यांनी या वेळी दिल्या.
हे ही वाचा...‘या’ कलावंतांनी नांदेडकरांना जिंकले
कर वसुलीचे मोठे आव्हान
महापालिकेला मालमत्ता तसेच पाणीपट्टी कर वसुलीचे मोठे आव्हान आहे. ता. ३१ मार्चपर्यंत तीनच महिने शिल्लक असून जवळपास दोनशे कोटींहून अधिक कर वसुली करायची आहे. त्यात मागील थकबाकी वसुलीचाही डोंगर आहे. महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न या करातून मिळत असते. त्यामुळे त्याची वसुली होणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांमध्ये या बाबत जनजागृती करण्यासोबतच पदाधिकारी आणि नगरसेवकांनीदेखील करवसुलीसाठी प्रयत्न केले तर निश्चितच त्याचा फायदा महापालिकेला होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
मालमत्ता करासंदर्भातील तपशील...
- एकूण मालमत्ताधारक - एक लाख १६ हजार
- चालू वर्षाची कराची मागणी - ५५ कोटी रुपये
- मागील थकबाकी - २०५ कोटी रुपये
- मागील थकबाकीवरील शास्ती - ५५ कोटी रुपये
- अनधिकृत बांधकाम शास्ती - २० कोटी रुपये
- आतापर्यंतची कर वसुली - २४ कोटी रुपये
मागणी नोटिसा बजावल्या
मालमत्ताधारकांनी चालू वर्षाची कराची मागणी व मागील थकबाकी भरावी, यासाठी मागणी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यात काही दुरुस्ती असेल तर ती वसुली लिपिक, वसुली पर्यवेक्षक तसेच मालमत्ता विभागातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षीपेक्षा या वर्षी जास्त कर वसुली करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
- अजितपालसिंघ संधू, उपायुक्त.
मालमत्ताधारकांनी घ्यावा फायदा
मालमत्ताधारकांना शास्तीमाफीची मुदत ता. ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. थकबाकीवरील शास्ती शंभर टक्के माफ करण्यात आली आहे, तर अनधिकृत बांधकाम शास्तीमध्ये या आधी सूट मिळाली नसल्यास चालू वर्षीच्या अनधिकृत बांधकाम शास्तीमध्ये ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्या संधीचा फायदा मालमत्ताधारकांनी घ्यावा आणि वेळेत कर भरावा.
- अमितसिंह तेहरा, सभापती, स्थायी समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.