phata 
मराठवाडा

Video ः विनाकारण फिरताय..? मग मिळेल काठीचा प्रसाद, कुठे ते वाचा..

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत बंदी घातलेली असतानाही परजिल्ह्यात जाणाऱ्या व येणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता.२४) सकाळी खानापूर फाट्यावरच रोखण्यात आल्याने दुचाकी वाहनाने ‘अप-डाऊन’ करणाऱ्यांची यामुळे मोठी गोची झाली. दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली असतानाही ‘मॉर्निंगवॉक’साठी वसमत रस्त्यावर आलेल्यांना नवामोंढा पोलिसांनी घरी जाण्यास सांगत अनेकांना ‘सौम्य प्रसाद’ देत संचारबंदीची आठवण करून दिली.

जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून ४८ तास शहर हद्द व त्यापुढील पाच किलोमीटर अंतराच्या परिसरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच गुरुवारी एका आदेशान्वये खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातून परजिल्ह्यात जाणाऱ्या व परजिल्ह्यातील शहरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरदेखील बंदी घातलेली आहे.

पहाटेपासूनच कठोर अंमलबजावणी...
नवा मोंढा पोलिसांनी सकाळी शुक्रवारी (ता. २४) सकाळी सहा वाजेपासूनच खानापूर फाटा येथे शहरबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवला आहे. फौजदार श्रीधर वाघमारे यांच्यासह कर्मचारी श्री. बाजगीर, श्री. देशपांडे, टाकरस, वाहतूक शाखेचे मनोज जैस्वाल यांच्यासह आठ ते दहा कर्मचारी येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी, तपासणी करीत होते. सकाळी दूध विक्रेते शहरात दाखल होत असतात. त्यांच्याही कॅन तपासत, पास चेक करून त्यांना श्री. तट व फौजदार श्रीधर वाघमारे सोडत होते.

मुजोरी, वाद घालणाऱ्यांची वाहने जप्त
‘कोरोना’चा प्रसार होऊ नये म्हणून शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनादेखील जिल्ह्यात येण्यास व जाण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही अनेक कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच शहराबाहेर जात असल्याचे चित्र होते. तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांना खानापूर फाट्यावरच रोखण्यात आले. सौम्य भाषेत सांगितल्यानंतर काहीजण परतले. परंतु, काही कर्मचारी वाद घालीत असल्याचे चित्र होते. अशांची वाहनेदेखील जप्त करण्यात आली. अनेकजण किरकोळ कामासाठी घराबाहेर पडल्याचेही दिसून आले. अशांचीही वाहने जप्त करण्यात आली. काही हौशी ‘मॉर्निंगवॉक’साठी पायी तसेच सायकलवर रस्त्यावर उतरले होते. त्यांचीही या वेळी ‘हौस’ भागवण्यात आली. मुजोरी करणारे, वाद घालणारेही महाभाग दिसून आले. त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

परजिल्ह्यातूनच ‘कोरोना’चा प्रवेश...
शहरात आढळून आलेला कोरोनाबाधित रुग्ण शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील आहे. तो शहरात आला आणि ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा ऑरेंजमध्ये गेला. सुदैवाने सदरील रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या कुटुंबातील नवीन सदस्यांचे दुसरे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत. प्रशासन सर्व स्तरांवरून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे. संचारबंदीत सकाळी ढील दिली जात असून या कालावधीत होणारी गर्दी तर अवाक करणारी आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र आहे. तसेच शहरातील खुल्या मैदानावरदेखील ‘मॉर्निंग वॉक’साठी म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाटांची संख्यादेखील वाढली आहे. गुन्हे दाखल करून, वाहने जप्त करूनही नागरिकांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रशासनाला वारंवार टप्प्याटप्प्याने कर्फ्यूदेखील लावावा लागत आहे.

नागरिकांना दिली समज
शहरात कर्फ्यू लागलेला असून शुक्रवारी पहाटेच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारीदेखील पॉईंटवर तैनात करण्यात आले होते. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे हे प्रत्येक पॉईंटवर जाऊन आढावा घेत होते, तसेच दत्तधाम परिसरात जाऊन त्यांनी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनादेखील ‘चांगलीच’ समज दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT