muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

आज सुपात तर..

डॉ. नीलिमा घैसास

दोन पिढ्यांमध्ये संघर्ष होत असतो. उगवत्या पिढीला मावळत्यांचे काहीच पटत नाही. मग एकमेकांतील मतभेदांची जागा मनभेद घेऊ लागतात. उगवत्यांच्या वागण्याने मावळती पिढी आतून दुखावली जाते.

अभिजित छोट्या आरवकडे अगदी कौतुकाने पाहत होता. डोळ्यांत अतीव वात्सल्य होते. त्याच वेळी अंजलीताई अभिजितला न्याहाळत होत्या. त्यांच्याही डोळ्यांत वात्सल्य होते, अन्‌ कारुण्यही. चला... आपला मुलगा अभिजित आपल्याशी फटकून वागत असला, तरी निदान त्याच्या बाळाकडे-आरवकडे प्रेमाने पाहत आहे ना! म्हणजे त्याच्या वागण्यातील फरक हा "पर्सन स्पेसिफिक' झाला आहे तर!

अरुणकाका व अंजलीताई यांचा मोठा कारखाना होता. अगदी शून्यातून उभा केलेला. अभिजित हे त्यांचे एकुलते एक अपत्य. अभि यूएसमधून एम.एस. होऊन आला. सर्व शिक्षण स्कॉलरशिपवर झालेले. अत्यंत हुशार, शिवाय विनम्र! सर्वार्थाने दृष्ट लागेल, असे हे कुटुंब. त्याला साजेशीच पत्नी मिळाली. आरवचाही जन्म योग्यवेळी झाला. अभि-अनुजा दोघेही इंजिनिअर. ते पण घरातील व्यवसायात लक्ष घालू लागले. गेल्या एक-दोन वर्षांत मात्र सारेच चित्र कसे पालटले. अभिचे वागणे आताशा फारच बेताल झाले होते. म्हणजे तो व्यसनी झाला नाही. उधळपट्टी करत नाही. लफडी नाहीत. तरी बेताल हा शब्द बरोबर आहे. म्हणजे कुठे तरी त्याच्या जीवनातील सूर-ताल हरवून बसला आहे. अतिशय कोरडे वागणे, तुटक बोलणे, काम सोडून जगण्यात काही ओलावा असतो, हेच विसरून गेला आहे. सतत कशाची तरी गडबड... जिवाला शांतपणा तो नाहीच. घरातील सर्व जण व्यवसायाचे काम बघत असल्याने कुठे तरी वैचारिक मतभेद होणारच. पण, याचा अर्थ आई-वडिलांशी कसेही उर्मटपणे बोलणे बरोबर होईल का? मतभेद होणे ठीक आहे, पण मनभेद होऊ लागले. अभिने आई-वडिलांशी बोलणेच बंद केले.

इनोव्हेशन, पॅशन, कम्पॅशन यांचा सुंदर मिलाफ अरुणकाकांच्या ठायी होता. कोणाला नव्याने उद्योगधंदा चालू करायचा झाल्यास ते आवर्जून काकांकडे मार्गदर्शनासाठी येत. काकाही हातचे काही राखून न ठेवता त्यांना मदत करतात. याउलट अभि मात्र फॅक्‍टरीत कधीही काकांचा सल्ला तर घेत नसेच, पण ते समोरासमोर आले, तर साधी ओळखही दाखवीत नसे. इतर स्टाफसमोर त्याचे हे काका-अंजलीताईंना खूप अपमानास्पद वाटे. ज्या कर्मभूमीत त्यांनी आजपर्यंत ताठपणे उभे राहून कर्तृत्व गाजविले तेथेच पोटच्या पोराकडून ही उपेक्षा! सर्व स्टाफच्या नजरेतून ही गोष्ट कशी सुटेल?

अभि इतका स्वतःच्याच विश्‍वात असायचा, की त्याला हे सामाजिक भान असणे शक्‍यच नव्हते. त्याच्या एका वेगळ्याच कैफात, वेगळ्याच धुंदीत तो असायचा. काम खूप करायचा, पण त्याच्या पद्धतीने. काकांना जमेत न घेता. यामुळे अंजलीताई-काकांच्या सुख-शांती-समाधानाला गालबोट लागले होते. अंजलीताईंनी विचार केला, की अभिला एकदा समजावून पाहावे. त्याच्या मनात काही शल्य असेल ते जाणून घ्यावे. तेव्हा झालेल्या संभाषणात अभि खाडकन्‌ म्हणाला, ""प्रत्येक आई-वडील मुलासाठी सर्व करतच असतात. त्यात तुम्ही वेगळे काय केले? खूप कष्ट करून इंडस्ट्री उभी करण्याची तुमची पद्धती होती. मी थोडेच सांगितले होते. ते सर्व तुमचे तुम्ही बघून घ्या, उगीच आम्हाला ऐकवू नका.'' आता मात्र अंजलीताई-काका पुरते हतबल झाले. अभि आपल्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना कायमचा संपला आहे. हे केवळ आपले दुर्दैव!

अभिला अरुण काकांशी कशाबद्दल चर्चा करणे म्हणजे खूप अपमानास्पद वाटत असावे. त्यामुळे तो स्वतःच्या "इगो'ला जपत, काही वेळा जरा अतिरेकी निर्णयही फटाफट घेऊन टाके. काकांची यात खूप ससेहोलपट होई. विरोध करावा तर अभिचे आणखी डोके फिरेल. न करावा तर डोळ्यांदेखत नुकसान होणार. अभिमध्ये सध्या एक रावण थैमान घालत होता. हुशार, कर्तृत्ववान, पण अत्यंत अहंकारी! हा अहंकारच अभिला एखाद्या दिवशी गोत्यात आणणार, हे काका जाणत होते. अभिमान जरूर असावा, पण अस्मिता म्हणून असावा, घमेंड म्हणून नसावा. अभिने जेव्हा अंजलीताईंना फारच दुखावले तेव्हा एक क्षण असा आला, की अंजलीताईंच्या मनात आले, "आत्ता तू आरवसाठी एवढा जीव टाकतो आहेस, पण उद्या तोदेखील तुझ्या वयाचा झाला की तुझ्याशी असेच फटकून वागेल. आज सुपात आहेस, उद्या जात्यात जाशीलच आणि तेव्हा मग तुला आमच्या जिवाची होणारी घालमेल, तगमग समजेल. पण, तेव्हा त्याबद्दल "कन्फेशन' करावेसे वाटले, तरी आम्ही थोडे असणार आहोत.' अंजलीताई क्षणातच चपापल्या. आपल्या मनात असा विचार यावा, यानेच त्या कासावीस झाल्या, अभिच्या लेखी आपण कोणी नसलो, तरी माझे मात्र ते बाळ आहे आणि बाळच राहील. आणि मला "आरव अभि-अनुजाशी कायम प्रेमाने वागो, त्यांची काळजी घेवो' अशी मनापासून ईश्‍वरचरणी प्रार्थना करू लागल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT