मुक्तपीठ

ती भयाण रात्र...

पद्माकर आलेगावकर

पावसाळी काळोख्या रात्री आमराईतून नदी ओलांडताना एकाची सोबत मिळाली खरी; पण तो कोण होता? मधेच कधी, कुठे निघून गेला?

संध्याकाळ होताच पावसाच्या एक- दोन सरी पडण्याचे ते दिवस. त्याकाळी पुण्याहून मुंबईकडे सायंकाळी साडेपाचला निघणाऱ्या गाडीने मी कर्जतला जात असे. शांत, आवाज न करणारे अक्षरशः रेडियमचे शेकडो दिवे संध्याकाळच्या अंधेऱ्या प्रकाशात चमकत असत. खिडकी- दारे उघडी असता एखादा काजवा हातावर येऊन बसत असे. झाडांच्या खिडक्‍यांतून डोकावणारी उतरत्या छपरांची, नळीच्या कौलांची घरे, धुऊन पुसून स्वच्छ झाली. पहिल्या पावसाचे पाणी वाहून आता त्या छपरांनी स्वच्छ पाण्याच्या पांढऱ्या मोत्यांच्या मुंडावळी वर्षाराणीसाठी बांधल्या होत्या. नुकतीच हळद लागलेले "डराव डराव' वेदघोष करत होते. मध्येच एखादी नानेटी, दिवड सटकन रुळाच्या कडेने गवतात शिरत होती. घाटातील जंगलातील गंभीरनाथाचे दर्शन घेऊन आम्ही सात-आठ जण गाडीचा आवाज ऐकून उतरत्या डोंगरावरून धावू लागलो.
ंमंकी हिलच्या "ब्रेक चेकिंग स्टेशन'वर गाडीत चढत असू. स्टेशन कसले! न फलाट, न निश्‍चित जागा. साधारणतः डब्यांच्या दारांचा अंदाज घेत आम्ही रुळांजवळ जरा सावधपणे जागा शोधू लागलो. दरवाजाचे उंच पोल, त्यात दारातच माणसे उभी; पण लगेच मदत करणारी. मी आणि एक जरा मोठा उंच विद्यार्थी बरोबरच्या आठ-दहा जणांना "स्लो' झालेल्या गाडीत चढवत होतो. पाहता पाहता गाडीने वेग घेतला. उंच असलेला तो चालत्या गाडीचा पोल हातात येईना आणि लोंबकळण्याचीही शक्‍यता नसल्याने दोघांनीही गाडी धरलेले हात सोडले. कडेच्या खडीतून दोन पावले पळत तो नाद सोडला. आम्ही रुळावर उभे राहून गाडीकडे पाहत होतो.

आता सात वाजायला आले होते. चोहीकडे दाट अंधार वाढत होता. सुखद सायंकाळ संपली. रातकिड्यांचा कीर्रऽऽऽ आवाज वाढू लागला. तेवढ्यात तो विद्यार्थी म्हणाला, "सर, मागे सरका, जनावर ओरडतंय. मला जनावर दिसेना. जनावर म्हणजे साप आणि तो ओरडत नाही. संबंध बेडूक गिळण्यासाठी त्या सापाने बेडकाचे दोन पाय तोंडात दाबून धरले होते. तो बेडूक जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्या अर्धवट अंधारात आम्ही दोघांनी भीत भीतच, पण सावधपणे ते दृश्‍य पाहिले. आता जायचे कुठे, करायचे काय? पुण्याहून उशिरा सुटणारी "पॅसेंजर' याच घाटात, याच ठिकाणी दीड- दोनला थोडी मंदगती होणार. मग आम्ही त्या गाडीत चढणार...! तोपर्यंत काय? तिथे रुळांवर बसणे एवढाच उपाय.

मध्येच गाडीचा प्रकाश दिसला. माणसांचे अस्तित्व. किती आनंद. पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेलाइनवर ती होती. आम्ही दोन्ही मार्ग सोडून गाडीकडे पाहात मागे सरलो. त्या गाडीच्या प्रकाशझोतात ते सारे वातावरण आणखीनच भयाण वाटले. गाडी गेली. तेवढीच त्या जंगलात माणसाची हालचाल. दोघे नुसते बसून होतो. सकाळी गंभीरनाथजवळ कुणी मुलांनी आणलेले खाल्ले होते, पाणी प्यायलो होतो. आता रात्रीचे साडेआठ वाजायला आले होते. भूक तर लागलीच होती; पण कोणाला काय सांगणार? मिट्ट काळोख. पावसाळी दिवस. न चंद्र न चांदण्या. कोणता प्रकाश होता कोण जाणे? आम्ही दोघे आहोत एवढेच कळत होते. साधी काठी हातात नव्हती. मी शिक्षक, घाबरणार कसा? तो आठवीतील विद्यार्थी. काही न सुचणे, सुन्न होणे म्हणजे काय, आता कळत होते. माझ्या घरी तरी काय काय समजत असतील? एखादी पुण्याकडे जाणारी गाडी पाहावी तर तीपण येत नव्हती. जी आली ती थांबलीच नाही. आता?
अंधार, नीरव शांतता, तपश्‍चर्या संपली. पुण्याहून पॅसेंजर आली. दारे बंद. म्हणून विद्यार्थी खिडकीतून आत शिरला. तेव्हा खिडक्‍यांना गज नव्हतेच. माझ्यासाठी दार उघडले. माझे लोंबकळणे संपले. आत जाताच एकाला विचारले, ""किती वाजले?'' ते गृहस्थ म्हणाले, ""अडीच...'' माणसांत आलो. कर्जत आले, उतरलो. त्याचे घर अगदी रेल्वे स्टेशनजवळच! तो म्हणाला ""तुम्ही जाणार?'' मी "हो' म्हणालो. कर्जत गावापलीकडे आमराई व नदीपलीकडे दहिवलीत माझे घर. रस्ता पायाखालचा असला तरी दिवसाचा... रात्री नव्हे. नदीकाठचा रस्ता पकडला. कुत्र्यांना मी बिलकूल आवडलो नाही. त्यांच्या स्वागताने घाबरलोच. पण पळणार तरी कुठे? चालत होतो. एक भयाण काळा ढीग आणि त्या शेजारी काळी आकृती. मी म्हणालो, ""बाबा, तुम्ही इकडे?'' खांद्यावरची घोंगडी सरकवत म्हणाला, ""ही बघा ना, म्हस अडलीय म्हणून बसलो.'' मी म्हणालो, ""हे तीन आंबे सोडून नदीपलीकडे येता माझ्याबरोबर?'' ते बाबा "हो' म्हणाले. खूपच आधार वाटला. मी त्यांना घरापर्यंत नेले. नदीच्या पलीकडे गुरांचा दवाखाना कुठे आहे ते सांगितले. घराचे दार दिसले... आभार मानण्यासाठी वळलो, तर ते बाबा कधी मागच्या मागे निघून गेले होते कळलेच नाही. त्या दिशेला नमस्कार केला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT