मुंबई ः श्रमिक स्पेशल ट्रेनची प्रतिक्षा करताना उन्हात थांबावे लागलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. वसईतील सनसिटी येथे श्रमिक स्पेशलने जाण्यासाठी स्थलांतरीतांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे अनेकांना उन्हातच उभे रहावे लागले होते.
नालासोपारा येथील विभोत्मा सुरेंद्र सुकला या मंगळवारी सकाळी मुलांसह सनसिटी ग्राऊंडवर आल्या. त्यांना जौनपूर येथे जायचे होते. मंगळवारी वसईहून जौनपूरसाठी चार ट्रेन रवाना झाल्या. विभोत्मा यांना संध्याकाळी पाचच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्यांना कमालीचा थकवाही जाणवत होता.
मुलाने त्यांना शेजारील मंडपात बसण्यासाठी विनंती केली, पण काही वेळातच त्यांनी उलट्या करण्यास सुरुवात केली. त्यांची शुद्ध हरपली.
त्यांना तातडीने वसईतील गोल्डन पार्क रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांना मधूमेहाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या कागदपत्रांची पोलिसांकडून छाननी तोपर्यंत झाली नव्हती असेही सांगितले जात आहे. टोकन मिळण्याची चिंता असल्याने त्यांनी औषधही घेतले नसावे असे सांगितले जात आहे. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे सूत्रांनी सांगितले.
वसईहून दुपारनंतर ट्रेन सुटतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही स्थलांतरीतांनी सकाळपासून सनसिटी ग्राऊंडमध्ये येण्यास सुरुवात केली होती. काहींनी कडक उन्हापासून आपले संरक्षण करण्यासाठी छत्रीही आणली होती, तर काहींनी बेडशीटचा वापर केला. त्यापैकी अनेकांनी सनसिटी ग्राऊंड आल्यानंतर प्रवासाचा फॉर्म भरला होता.
वसईतून एकाच दिवशी सहा श्रमिक स्पेशल सोडल्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच पोलिस नाराज होते. या सर्व श्रमिकांना बसने आणण्याचे आव्हान खडतर होते. तसेच त्यांचे व्यवस्थापनही आव्हानात्मक होते.
श्रमिक स्पेशलने निघालेल्या स्थलांतरीताचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना. यापूर्वी 14 मे या दिवशी हरिश शंकरलाल यांचे निधन झाले होते. राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनने जाण्यासाठी ते भाईंदरहून वसईला चालत आले होते. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.