Lok Sabha Election Result Mumbai sakal
मुंबई

Lok Sabha Election Result Mumbai : मुंबईत आवाज शिवसेनेचाच

लोकसभा निवडणुकीत मुंबईचा कल हा देशाचा कल मानला जातो. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईने भाजप-शिवसेनेच्या बाजूने कौल दिला होता, तर २००४, २००९ मध्ये मुंबईकरांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’च्या उमेदवारांना निवडून दिले होते.

विनोद राऊत

लोकसभा निवडणुकीत मुंबईचा कल हा देशाचा कल मानला जातो. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईने भाजप-शिवसेनेच्या बाजूने कौल दिला होता, तर २००४, २००९ मध्ये मुंबईकरांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’च्या उमेदवारांना निवडून दिले होते. या वेळी मात्र मुंबईकरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणे पसंत केले आहे. आघाडीला चार, तर महायुतीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर फेरमतमोजणीत काठावर म्हणजे केवळ ४८ मतांनी विजयी झाले आहेत.

मुंबईत या वेळी शिवसेनेने सहा जागांपैकी चार जागा; तर काँग्रेसने दोन जागा लढविल्या. अडीच दशकांपासूनची भाजपशी परंपरागत युती मोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेसचा हात धरला. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष गेला, धनुष्यबाणही गेले. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांवर लागलेले चौकशी यंत्रणांचे शुक्लकाष्ठ हे मुंबईतल्या मराठी मतदारांना आवडले नाही. अनंत अडचणी समोर येऊनही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा लढावू बाणा सोडला नाही, हे कुठेतरी मुंबईतील मराठी माणसाला भावले, असेच निकालातून स्पष्ट होते.

मराठी मतदार पाठीशी

मुंबईत ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई होती. पक्षाची पडझड होऊनही उद्धव ठाकरे यांनी शांतपणे मुंबईतील रणनीती आखली. इतर पक्ष जेव्हा उमेदवारांसाठी चाचपडत होते, त्या वेळी ठाकरे यांच्या उमेदवारांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली होती. आंबेडकरवादी आणि मुस्लिम मते शिवसेनेला आतापर्यंत कधी मिळाली नाहीत.

मात्र या वेळी ‘राज्यघटना, लोकशाही बचाव’ या नाऱ्यावर दलित, मुस्लिम मतांनी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) झोळी भरली. मराठी मतदार पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे शिवसेनेला चारपैकी तीन जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उत्तर- मध्य मुंबईतून अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार उज्ज्वल निकम यांची ५९ हजारांची आघाडी पार करून विजय संपादन केला. उत्तर मुंबई या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात पीयूष गोयल यांनी तीन लाख ५३ हजार २५६ मताने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. मात्र गोयल यांचे मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा एक लाखाने घटले.

राज ठाकरे यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न

गुजरातीबहुल ईशान्य मुंबईतही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत अगदी शेवटच्या टप्प्यात मनसेलाबरोबर घेऊनही भाजपला मराठी मतांची फाटाफूट करता आली नाही. एकंदरीत लोकसभेत यश मिळवण्यासाठी सर्व काही करूनही मुंबईसह राज्यात भाजपच्या जागा निम्म्‍याहून कमी आल्या. त्यामुळे आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्ये भाजपला धोक्याची घंटा आहे. तसेच राज ठाकरे यांच्यापुढे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT