कर्जत तालुक्यातील ओलमन येथील आदिवासी शेतकरी प्रभाकर रामचंद्र पादीर यांनी पाणी टंचाईवर मात करत चक्क माळरानावर फळबाग फुलवली आहे. फळझाडांसाठी पाण्याचे नियोजन म्हणून त्यांनी प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी फळबाग फुलवली आहे.
गील काही वर्षांत तालुक्यातील हजारो एकर शेतीवर गृहप्रकल्प, फार्महाऊस उभे राहत आहेत. मात्र, दुसरीकडे वडिलोपार्जित शेती सांभाळण्यावर आजही काही शेतकरी भर देत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. तालुक्यातील ओलमन गाव हे मोजक्याच घरांची वस्ती असलेले गाव.
याच गावातील पादीर यांची गावाच्या खालच्या भागात वडिलोपार्जित १२ एकर माळवरकस शेती आहे. माळवरकस असल्याने कशाला काही करायचे असे अनेकांनी त्यांना समजावले; पण पादीर यांचा निश्चय दृढ होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी काही आंब्यांची कलमे लावली. त्यानंतर दोन वर्षे ती जगल्यावर त्यांनी जवळील प्रकृती संस्थेला भेट देऊन त्यांच्याकडून मदत घेतली.
मागील पावसाळ्यात २०० पपई आणि १६० आंब्यांची रोपे त्यांनी आपल्या दोन एकर शेतात लागवड केली. ही रोपे देखील प्रकृती संस्थेने त्यांना दिली. त्यानंतर मोठे संकट होते ते पाण्याचे! ही गोष्ट प्रभाकर यांच्या लक्षात होती.
म्हणून त्यांनी एक शेततळे निर्माण केले. पाऊस सरल्यावर समोरून जाणाऱ्या नाल्यातील पाणी पंपाच्या साह्याने शेतातील तळ्यात साठवून ठेवले. पंपाने पाणी झाडांपर्यंत नेले, तर पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने दोन लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बाटल्या घेतल्या. त्यांच्या झाकणाजवळ छिद्रे केली.
त्या बाटल्या प्रत्येक झाडाजवळ दोन अशा करून लावल्या. याच बाटल्यांमधून दिवसभर हवे तेवढे पाणी झाडाला वापरले जाते. पादीर यांना या कामात त्यांची पत्नी चांगुणा यासुद्धा मदत करतात. पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे आता पपईच्या झाडांना फळे लगडली आहेत.
तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आंब्यांच्या झाडांना मागील वर्षी ५ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा आंब्यांच्या झाडांना मोहर चांगला आला आहे. आंबे आणि पपई अशी दोन्ही झाडांचे चांगले उत्पादन त्यांना मिळेल, अशी आशा आहे.
सेंद्रिय खताचा उत्पादनात वापर
आपल्या शेतीतील झाडांना लगडलेली फळे रुचकर असायला हवीत, यासाठी त्यांनी जीवामृत, शेणखताचा वापर केला. शून्य खर्चात जास्त उत्पादन व रासायनिक खतमुक्त फळांचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.
शेती ही आपली आई आहे. तिच्यात घाम गाळला, तर कातळ असलेल्या भागातही पीक बहरते. मी विचार केला, त्याला प्रकृती संस्थेची साथ मिळाली. त्यामुळे आज दोन एकरावर माझी शेती बहरली आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळाले, तर हीच शेती अजून वाढवण्याचा माझा मानस आहे.
- प्रभाकर रामचंद्र पादीर, आदिवासी शेतकरी, ओलमन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.