एपीएमसीतील ड्रायफ्रूटच्या व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : ड्रायफ्रूटचा पुरवठादार असल्याचे भासवून एका भामट्याने एपीएमसी मार्केटमधील एका ड्रायफ्रूटच्या व्यापाऱ्याची तब्बल ८२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अनिल राजगुरूकर असे या भामट्याचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार अमृत ढवळे हे ड्रायफ्रूटचे व्यापारी असून एपीएमसीतील मसाला मार्केटमध्ये रचना ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ते दीपक भोईर व सुनीलकुमार अग्रवाल यांच्यासह ड्रायफ्रूटचा इंपोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी अनिल राजगुरूकर याने मेसर्स अक्षदा एंटरप्रायजेस या कंपनीचा प्रोप्रायटर असल्याचे भासवून मार्केटमधील दलाल कमलेश याच्या माध्यमातून ढवळे यांच्यासोबत ओळख करून घेतली होती. त्या वेळी राजगुरूकर याने त्याच्या कंपनीचे कार्यालय कोपरखैरणे येथे असल्याचे तसेच त्याचा ड्रायफ्रूट सप्लायचा व्यवसाय असल्याचे ढवळे यांना सांगितले. ढवळे यांच्याकडे असलेला ड्रायफ्रटूचा माल सप्लाय करण्याची इच्छासुद्धा त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी ढवळे यांनी राजगुरूकर याच्यावर विश्वास ठेवून त्याला ड्रायफ्रूटचा माल देण्याची तयारी दर्शवली.
मार्च २०२० मध्ये आरोपी अनिल राजगुरूकर याने ढवळे यांच्याकडून १५ लाख ४६ हजार रुपये किमतीचे ड्रायफ्रूट विकत घेऊन त्याची रक्कम तीन महिन्यांच्या कालावधीत थोडी थोडी करून दिली होती. त्यानंतरदेखील राजगुरूकर याने ढवळे यांच्याकडून घेतलेल्या ड्रायफ्रूटच्या मालाचे पैसे ऑनलाईन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर राजगुरूकर याने जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये ढवळे यांच्याकडून एकूण ८२ लाख १० हजार रुपये किमतीचे बदाम, अंजीर, अक्रोड, पिस्ता असा ड्रायफ्रूटचा माल घेतला. मालाच्या पैशांबाबत ढवळे यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद करून पलायन केले.
राजगुरूकर याचा संपर्क होत नसल्याने ढवळे यांनी राजगुरूकर याने दिलेल्या कोपरखैरणे येथील पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी अनिल राजगुरूकर नावाची व्यक्ती राहत नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर अनिल राजगुरूकर याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर ढवळे यांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला; मात्र तो न सापडल्याने अखेर त्यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनिल राजगुरूकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.