चार वर्षांत ५, ८७८ मनोरुग्णांचा कुटुंबाकडून ‘त्याग’
राज्यातील चार मनोरुग्णालयातील स्थिती
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : आजारपणात नातेवाईकांची साथ मिळणे कोणत्याही रुग्णासाठी खूप गरजेचे असते, मात्र मानसिक आजाराने ग्रस्त हजारो रुग्णांना त्यांच्याच कुटुंबीयांनी सोडून दिलेले असते. राज्यातील ४ जिल्हा मनोरुग्णालयांमध्ये गेल्या ४ वर्षांत ५८७८ रुग्णांना त्यांचे नातेवाईक, पोलिस किंवा स्वयंसेवी संस्थांनी रुग्णालयात सोडले आहे. पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांनी आणलेले बहुतांश रुग्ण हे बेवारस असतात; तर अनेक कुटुंबे त्यांच्यापासून आपली सुटका करून घेतात.
मानसिक विकारांनी त्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी राज्यात ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी येथे ४ शासकीय मनोरुग्णालये आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत ५,८७८ रुग्णांना या रुग्णालयांत सोडण्यात आले आहे. बहुतेक रुग्ण स्किझोफ्रेनिया, डिमेंशिया, सायकोसिस, एपिलेप्सी, बायपोलर डिसऑर्डर (दुर्मिळ विकार) इत्यादींनी ग्रस्त आहेत.
पुण्यातील मानसिक रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, कुटुंबीय रुग्णाला घेऊन येतात आणि रुग्णालयातच सोडतात, ते जिवंत आहे की नाही याचीही चौकशी करण्यासाठी येत नाहीत. अनेक वेळा रुग्ण बरे होतात, मात्र कुटुंबातील कोणीही त्यांना घ्यायला येत नाही, परिणामी रुग्ण रुग्णालयातून पळून जातात.
नागपूर जिल्हा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले की, आमच्या रुग्णालयातील एक तृतीयांश रुग्ण हे त्यांच्या नातेवाईकांनी सोडून दिलेले आहेत. अनेक वेळा असे दिसून आले आहे की ५० टक्के रुग्णांची तब्येत सुधारते, तर निम्मे रुग्ण बरे होत नाहीत. आमचे सामाजिक कार्यकर्ते जे बरे होतात त्यांना कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न करीत राहतात. अनेक वेळा नातेवाईकच रुग्णाला परत स्वीकारत नाहीत. अशा वेळी न्यायालयाने स्थापन केलेल्या कोर्ट व्हिजिटर कमिटीने अशा प्रकरणांचा आढावा घेऊन सरपंच, पोलिस आदींच्या मदतीने कुटुंबीयांना समजावून सांगून १० ते १५ जणांना पुन्हा घरी पाठवले. ज्यांचे कोणीही नसते त्यांना आम्ही छोटी मोठी कामे करण्यासाठी प्रशिक्षण देतो. आतापर्यंत अशा १५ रुग्णांना स्वयंसेवी संस्थेने नियुक्त केले आहे.
सर्वाधिक प्रकरणे नागपूर आणि रत्नागिरीत -
राज्यात २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत रुग्णालयात सोडून दिलेल्या एकूण ५८७८ पैकी सर्वाधिक ३८२९ मानसिक रुग्ण आहेत. त्यानंतर रत्नागिरीत १६७४, पुण्यात ३६१ आणि ठाण्यातील किमान १४ रुग्ण कुटुंबीयांनी सोडले आहेत.
कुटुंबाचा सक्रिय सहभाग आवश्यक -
बऱ्याच वेळा रुग्णांना रुग्णालयात अधिकचा भार म्हणून सोडले जाते, मी लोकांना आवाहन करतो की उपचार प्रक्रियेत कुटुंबाचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा आहे. काही अडचण असेल तर कुटुंबानेही त्यानुसार जुळवून घेतले पाहिजे.
डॉ. प्रवीण नवखरे,
अधीक्षक, नागपूर जिल्हा मानसिक रुग्णालय.
कुटुंबाकडून कमी पाठिंबा -
घरच्यांचा फार कमी पाठिंबा आहे. रुग्णाला रुग्णालयात सोडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीही ते कधीच येत नाही. कधी कधी ते पत्ता चुकीचा टाकतात. जेव्हा आम्ही रुग्णाला घरी सोडायला
जातो तेव्हा त्या पत्त्यावर कुणीच राहत नाही हे कळतं.
डॉ. साधना तायडे
संचालक, आरोग्य आणि सेवा संचालनालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.