आरोग्यासाठी धावल्या ग्रामीण भागातील महिला
तालुक्यातील पहिली पिंकथॉन स्पर्धा उत्साहात; मिलिंद सोमणचा सहभाग
पाली, ता. १७ (वार्ताहर) ः रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्या वतीने पिंकथॉन रन फॉर रूरल हेल्थ ही पहिली पिंकथॉन शुक्रवारी (ता. १५) पार पडली. सुधागड तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील कवेलेवाडी ते देऊळवाडी या ठिकाणी १५० हून अधिक स्थानिक महिलांनी दोन किलोमीटर पिंकथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन त्या जोमाने धावल्या. या पिंकथॉनमध्ये मिलिंद सोमण व त्यांची पत्नी अंकिता कोणवर सहभागी झाले होते.
ग्रामीण महिलांना त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ही एक वार्षिक उपक्रमाची सुरुवात होती. या वेळी स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि पिंकथॉनचे संस्थापक अभिनेते मिलिंद सोमण यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकतेसाठी प्रेरित केले. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवा मर्यादित असलेल्या ठिकाणी फिटनेस आणि आरोग्य जागरूकतेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात स्वयम् चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. चित्रलेखा कळंबे यांच्या अत्यंत माहितीपूर्ण कर्करोग जागरूकता सत्राने झाली. त्यांनी स्तनाचा कर्करोगाच्या लवकर निदानाचे महत्त्व स्पष्ट केले आणि या बाबतच्या जागरूकतेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. यानंतर मिलिंद सोमण व त्यांची पत्नी अंकिता कोणवर यांनी दोन किलोमीटर धावण्याची सुरुवात केली. फिटनेस फक्त धावण्याबद्दल नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात साध्या सवयींमुळे आपल्या आरोग्यात चांगले बदल होऊ शकतात, असे मिलिंद सोमण यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमानंतर, सर्व सहभागी महिलांना पदके आणि स्तनाचा कर्करोग जागरूकता साहित्य देण्यात आले. कार्यक्रमामध्ये स्वदेस मित्र सिद्धेश्वर आदिवासीवाडी आसिका पवार, घोटावडे कासारवाडी पारू हिरवे व नवघर कासारवाडी नंदिनी जाधव यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवेलेवाडी ते देऊळवाडी गावविकास समिती व स्वदेस फाउंडेशन टीमने विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.