लोकोत्सवासाठी यंत्रणा सज्ज
२५ लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क
महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत २४ लाख ८८ हजार नागरिक २,७९० केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यासाठी १७ हजार निवडणूक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत मतदान केंद्राचा ताबा घेतला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी केंद्रीय सुरक्षा दल, सीमा सुरक्षा बलाच्या २० शस्त्रधारी तुकड्यांसह ४,३६१ पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. यातून ७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होईल. ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. शनिवार (ता. २३) रोजी मतमोजणी केली जाणार आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामाला लागल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट राहणार आहे. शाळांमधील शिक्षकवर्गही निवडणूक कर्तव्यावर असल्याने विद्यार्थ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
निवडणुकीच्या कालावधीत दोन दिवस दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. याचदरम्यान जिल्ह्यात यात्रोत्सव सुरू असल्याने यात काही बदल करण्यात आले आहेत. यात्रोत्सवांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवता येणार नसल्याने साजगावच्या विठोबा यात्रेवरही दोन दिवस निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व एसटी बस दोन दिवस निवडणूक कामासाठी जुंपल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळित झाली आहे. मतदानाच्या दिवशी कामगारांना काही वेळेसाठी सुट्टी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील मच्छीमारांनी निवडणुकीचा अधिकार बजावून मासेमारीस रवाना होण्यास सांगण्यात आले आहे. या सर्व नियम निर्बंधांमधून जिल्ह्यातील सात भावी आमदार निवडण्याचा संविधानिक अधिकार रायगडमधील २५ लाख मतदार निभावणार आहेत.
५५ हजार नवमतदार
निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागृतीमधून रायगडमधील ५५ हजार ८९३ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. पाच वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींचा येथील युवा पिढीवर प्रभाव पडला असल्याचे यावरून दिसते; मात्र यात युवतींची संख्या कमी आहे. २९ ऑक्टोबर रोजीच्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात ३१ हजार ६५६ पुरुष तर २४ हजार २३३ महिला नवमतदार आहेत.
सरासरी ६७ टक्के मतदानाचा अंदाज
नवमतदारांची झालेली नोंदणी, आदिवासी, मच्छीमार, कामगार वर्गात झालेली जनजागृती यामुळे रायगड जिल्ह्यात सात विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ६७ टक्के मतदान होईल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. दरवेळेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचे प्रकार घडत असतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान बाळगंगा धरणग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. आताच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले असल्याने या सर्व धरणग्रस्तांनी मतदान करण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील नागरिकांना बहिष्काराचा इशारा दिला होता, त्यांचीही समजूत काढण्यात यश आलेले आहे.
१६ हजार जणांचे टपाली मतदान
निवडणूक कामामध्ये व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता येत नसल्याने त्यांची गैरसोय दूर करत आयोगाने त्यांचे प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीच मतदान करून घेतले आहे. अशाप्रकारे टपाली मतदान करणाऱ्यांची संख्या १३ हजारांच्या आसपास आहे, तर गृहमतदान करणाऱ्यांची संख्या दोन हजार ३२९ इतकी असून या सर्वांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही एकूण गोळाबेरीज १६ हजारांच्या आसपास असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
२३३ अनिवासी करणार मतदान
परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोग मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत असते. विधानसभा निवडणुकीसाठी २३३ अनिवासी भारतीयांनी मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. या मतदारांना टपालाद्वारे मतपत्रिका पाठवण्यात येणार आहेत. मतदान करून या मतपत्रिका मतमोजणीच्या आधी पाठविण्यात आल्या होत्या. या मतपत्रिका निवडणूक विभागात येण्यास सुरुवात झालेली आहे. शनिवारपर्यंत (ता. २३) सर्व मतपत्रिका येणे अपेक्षित आहे.
सायबर सेल अलर्ट मोडवर
खुला प्रचार बंद झाला असला तरी गुप्त प्रचार सुरूच आहे. दरम्यान, मतदानाच्या अंतिम मुदतीपर्यंत वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण होऊ नये, यासाठी सायबर सेल अलर्ट मोडवर काम करीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय हालचालींसह सायबर सेलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सोशल मीडियाशी संबंधित सर्व प्लॅटफॉर्मवर उमेदवार, त्यांचे नातेवाईक, सोशल मीडिया इन्फ्लूएंजर तसेच पक्षांशी संबंधित खात्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने समाजमाध्यमांवर वांशिक, धार्मिक किंवा जातीविषयक पोस्टद्वारे सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या, नागरिकांत निवडणूक प्रक्रियेसंदर्भात निवडणुकीत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या तसेच हिंसा, फेक मेसेज, मॉर्फ केलेले फोटो, ऑडिओ, व्हिडिओ, एसएमएस निर्माण करणे किंवा शहानिशा न करता अशा पोस्ट शेअर करणाऱ्यांवर मीडिया कक्षाची करडी नजर आहे.
४९ केंद्रांवर पोलिस वायरलेसचा वापर
जिल्ह्यातील ४९ मतदान केंद्र नॉट रिचेबल असल्याचे ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोलिस वायरलेस वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. नेटवर्क असलेल्या गावात धावत किंवा वाहनाने जाऊन निवडणुकीची माहिती द्यावी लागणार होती. ही माहिती आता वायरलेसद्वारे देता येणार आहे. नेटवर्कअभावी जिल्ह्यातील दुर्गम ४९ मतदान केंद्रांवर ‘रनर’ ठेवण्याची वेळ आली होती. हे रनर लगतच्या नेटवर्क असलेल्या गावात धावत किंवा वाहनाने जाऊन मतदानाची माहिती देणार होते.
विधानसभा / पुरुष / महिला / नवमतदार/
पनवेल / ३,४६,४०२/३,०५,५८६/ १५,५५१/
कर्जत / १,५९,२९३/१,५९,४४६/७,९७३/
उरण / १,७१,५२६/१,७०,५६३/८,९१०/
पेण / १५,४६६/१,५३,३१७/६,८८०/
अलिबाग / १,५०,५४३/१,५५,६८६/६,७५५/
श्रीवर्धन / १,२९,९१८/१,३५,३६८/४,१५६/
महाड / १,४७,२२४/१,४९,१६४/५,६६८/
एकूण / १२,५९,५६७/१२,२९,१३०/५५,८९३/
-----
जिल्ह्यात सुरक्षेसाठी बंदोबस्त
पोलिस - १,८५९
होमगार्ड - १,६९६
सहाय्यक - ३९०
नवसंरक्षक - १४२
आरएसपी शिक्षक - ७०
नियंत्रण स्वयंसेवक - ५४
एनएसएस विद्यार्थी - २९०
निवृत्त पोलिस - २१
केंद्रीय राखीव सुरक्षा दल - दोन तुकड्या
सीमा सुरक्षा दल - एक तुकडी
विशेष राखीव पोलिस दल - एक तुकडी
एसएसबी- सात तुकड्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.