सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : राज्याच्या निर्यात क्षेत्रात जिल्ह्याचा वाटा ९.३ टक्के असून रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्यातवाढीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे पाच लाख ५६ हजार कोटी इतके तर जिल्ह्याचे ५१ हजार ७०० कोटींचे योगदान आहे. जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त व्यावसायिकांनी उद्योजकता प्रशिक्षण घेतले आहे. यातून हे प्रमाण वाढणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (ता. ६) उद्योग केंद्रामार्फत आयोजित निर्यात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बांबू क्लस्टरच्या माध्यमातून या वर्षी मनरेगा योजनेमध्ये एक कोटी बांबू रोपे तयार करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. बैठकीला कोकण विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, लीड बँकेचे महाव्यवस्थापक कुलकर्णी, संयुक्त संचालक जनरल ऑफ फॉरेन ट्रेड डीजीएफटी प्रवीण कुमार, हर्षद साळवी, रिषू मिस्त्रा, टी. आर. गिबिनकुमार, मनीषा कोळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना सहसंचालक विजू शिरसाट म्हणाल्या की, असोसिएशन, उद्योजक यांच्यासोबत बँकर्स आणि सरकारी अधिकारी समन्वयातून काम करीत आहेत. निर्यात क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षामध्ये निर्यातीमधील जिल्ह्याचे योगदान वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू असून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना इन्फ्रास्ट्रक्चर, स्टँप ड्युटी, वीजबिल आदींमध्ये सवलत देण्यात येणार आहे. उद्योजकांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही शिरसाट यांनी केले.
जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, त्यांच्यासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती बैठकीत देण्यात आली. कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातीसंबंधित कामकाज करणारे घटक उपस्थित होते.
मरीन आणि फिशिंगसाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गणपती क्लस्टर व बांबू क्लस्टर या दोन महत्त्वाच्या योजनांवर जिल्ह्यात काम चालू आहे. पांढऱ्या कांद्याला दोन वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन क्षेत्र ५०० हेक्टरपर्यंत वाढले आहे. पूर्वी ते २५० हेक्टर होते. हे क्षेत्र आणखी एक हजार हेक्टरपर्यंत वाढण्याचे उद्दिष्ट आहे.
- किसन जावळे, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.