ग्रामीण विज्ञान प्रदर्शनातूनच घडतील उद्याचे वैज्ञानिक
आमदार रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन; ५२ वे सुधागड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिमाखात
पाली, ता. ७ (वार्ताहर) ः विज्ञानामुळेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती व सृजनशीलतेचा विकास होत असतो. देशाचे भवितव्य घडवणारे ग्रामीण भागातील बालवैज्ञानिक अशाच प्रदर्शनातून पुढे येतील, असा विश्वास या वेळी आमदार रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला. सुधागड पंचायत समिती शिक्षण विभाग, विज्ञान गणित अध्यापक मंडळ व श्री राज एज्युकेशन सेंटर इंग्रजी माध्यम शाळा घोटवडे यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे सुधागड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घोटवडे येथे नुकतेच दिमाखात पार पडले. या वेळी आमदार रवींद्र पाटील उपस्थित होते.
या वेळी पाटील म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कला गुण असतात. त्यांनाही योग्य संधी उपलब्ध झाल्यास ते विद्यार्थीसुद्धा आपली योग्यता सिद्ध करतात. या शाळेला माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला, याबद्दल पाटील यांनी शाळेचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास सतत शाळेचा असून, पालकांचेसुद्धा मोलाचे सहकार्य आम्हाला मिळत आहे, असे प्रतिपादन श्रीराज एज्युकेशन सेंटरचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर जयंत जोशी यांनी केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भरतनाट्यम स्पर्धेत दोनदा नोंद झालेल्या श्रीराज एज्युकेशन सेंटर येथील विद्यार्थिनी वंशिता नाईक हिचा सत्कार आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात ७० प्रातिकृतींचा सहभाग होता. मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे. दुर्गम भागातील शाळांनीसुद्धा विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळाली की यातून संशोधनाची आवड निर्माण होते, असे प्रतिपादन तहसीलदार उत्तम कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली मात्रे व श्वेता देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राजक्ता गोळे यांनी मांडले. या कार्यक्रमाला तहसीलदार उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते, घोटवडे गावाचे सरपंच पांडुरंग झोरे, माजी प्राचार्य युवराज महाजन, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शांताराम बेलोशे, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मंदार सिनकर, गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे, शाळेच्या प्राचार्य वैशाली पांडे, वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.