मुंबई

उज्ज्वलांना पुन्हा चुलीचा आधार

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांची चुलीतील धुरापासून सुटका व्हावी, म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती. सरपण म्हणून वृक्षांचा वापर कमी व्हावा म्हणून गॅस वापरासाठी विविध सवलती देण्यात आल्‍या. दोन वर्षांपूर्वी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजनाही राबवण्यात आली; मात्र आता या सर्व योजना बंद झाल्‍या आहेत. गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने रायगडमधील जवळपास ५० हजार गृहिणींनी घरात गॅस शेगडी असूनही चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागात सध्या लाकूडफाटा जमवण्याची लगबग सुरू आहे. भल्या पहाटे जंगलात जाऊन महिला पावसाळ्यासाठी सरपणासाठी लाकूडफाटा जमवत आहेत. यामुळे जंगलातील वनसंपदेलाही धोका निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून या महिला जंगलातील लाकूडफाट्याचा वापर चुलीसाठी करीत आहेत. वृक्षतोडीतून पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांचे आरोग्य सुधारावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना गावोगावी राबवली होती. रायगड जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता देण्यात आले होते. घरगुती गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना गरीब कुटुंबांतील महिलांना प्रत्येक वेळेला मिळणारी गॅस सिलिंडरची सवलतही बंद झाली आहे. सिलिंडर घेणे परवडत नसल्‍याने अनेक महिलांनी स्‍वयंपाकासाठी चुलीचा आधार घेतला आहे.

नवीन जोडणी बंद
रायगड जिल्ह्यात ऑगस्ट २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन जोडणी देणे बंद झाले आहे. केंद्र सरकारने ही योजना राबवताना आठ कोटी गॅस जोडणीचे ध्येय दिले होते. केंद्राने ठरवून दिलेली संख्या पूर्ण झाल्याने गॅस कंपन्यांकडून नवीन जोडण्या देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे काही महिलांची इच्छा असूनही नवीन जोडणी मिळण्यात अडचणी येत आहेत.

उज्ज्वलाचे ६३ हजार ७८४ गॅस जोडणी
उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल होता. कमीत कमी कागदपत्रांत मोफत शेगडी आणि गॅस सिलिंडर मिळत असल्याने पहिल्या दोन वर्षांत गॅस जोडणीसाठी मोठी मागणी होती. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जवळपास ६३ हजार ७८४ गॅस जोडणी या वेळी करण्यात आली.

सध्या लाडकी बहीण योजनेची तपासणी सुरू आहे. यातील पात्र महिलांनाच तीन मोफत सिलिंडर योजनेचा लाभ मिळू शकेल. सध्याच्या घडीला मोफत सिलिंडरची योजना बंद आहे.
- सर्जेराव सोनावणे, पुरवठा अधिकारी, रायगड

एका महिन्याला गॅस सिलिंडरसाठी साधारण एक हजार रुपये लागतात. ते न परवडण्यासारखेच आहेत. दिवसेंदिवस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. त्‍यामुळे लाकूडफाटा गोळा करून सरपण जमा करून ठेवत आहे. चुलीवर स्‍वयंपाकासाठी कोणताही खर्च येत नाही, हे केवळ मेहनतीचे काम आहे.
- सारिका गुरव, गृहिणी, मापगाव

सुपारी-नारळाच्या बागेची साफसफाई करण्याचे काम मी मजुरीवर करते. दिवसभर काम करताना लाकूडफाटा जमा होतो, तो त्याच ठिकाणी न जाळता घरात आणते. मोलमजुरी करणाऱ्यांना गॅस सिलिंडरची रिफिलिंग परवडत नसल्याने हा बीनखर्चाचा मार्ग सोयीचा वाटतो.
- कविता पाटील, गृहिणी, अलिबाग

उज्जला योजनेंतर्गत गॅस जोडण्या
अलिबाग - ५,०७८
कर्जत - १०,४६०
खालापूर - ८,६२८
महाड - ६,१५३
माणगाव - ३,४७५
म्हसळा - ४,५२१
मुरूड - १,१६१
सुधागड - १,९१५
पनवेल - ३,९४७
पेण - १०,२९३
पोलादपूर - ७८७
रोहा - ५,४९८
श्रीवर्धन - ४,७३६
तळा - १,३८५
उरण - १,८४४
एकूण - ६९,८८१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT