मुंबई

रेवस बंदरासाठी नव्याने निविदा

CD

महेंद्र दुसार ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : अलिबाग ते उरण या दोन तालुक्यांमधील अंतर कमी होण्यासाठी रेवस-करंजा या मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे; मात्र सध्या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले आहे. रेवस येथील जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न केल्‍याने कंत्राटदाराला काम काढून घेण्यात आले आहे. त्‍यामुळे शिल्लक राहिलेल्या ४० टक्के कामासाठी पुन्हा सुधारित दराने निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ३५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वारंवार अडथळे आल्‍याने जेट्टीचे काम रखडले आहे. सध्या प्रवाशांना कसरत करीत आपली वाहने बोटीतून घेऊन यावी लागतात.
करंजा ते अलिबाग हे अंतर रस्ते मार्गाने ८६ किमी, तर सागरी मार्गाने केवळ तीन किलोमीटर आहे. सध्या या जलमार्गावर बोट (तर) सेवेच्या माध्यमातून वाहतूक केली जाते. या जलमार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने केले आहे. अलिबाग व उरण या दोन्ही तालुक्यातील लोकजीवनात खूपच साम्य आहे. एकमेकांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे येथे नेहमीच रहदारी असते. त्याचबरोबर पूर्वी मांडवा बंदराचा विकास झाला नव्हता, तेव्हा भाऊचा धक्का येथे रेवस येथूनच फेरी बोटी सुटायच्या. आता हे प्रमाण कमी झाले असले तरी मांडवा जेट्टीला पर्याय म्हणून रेवस जेट्टीचा विकास केला जात आहे.
खाडीभाग असल्याने पावसाळ्यात येथे उसळणाऱ्या लाटांचे प्रमाण कमी असल्याने जलप्रवास सुखरूप करता येतो. रेवस बंदराचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने रेवस बंदर विकासासाठी तयार केलेल्या २५ कोटी सात लाख रुपये खर्चाच्या कामाला कोरोनापूर्वी सुरुवात झाली होती. निसर्ग चक्रीवादळात कामाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर कामाचा खालावलेला दर्जा, सरकारकडून बिल देण्यास झालेल्या विलंबामुळे हे काम संबंधित कंत्राटदाराला वेळेत पूर्ण करता न आल्याने त्याच्याकडून काम काढून घेण्यात आले आहे. सध्या पुलाचे काम अपूर्ण असून लवकरात लवकर पूर्ण करावे आणि रो-रो सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मध्यवर्ती जेट्टीचा फायदा
बंदर विकासाच्या माध्यमातून जलप्रवासास प्राधान्य देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्यावर भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची रो-रो सेवा तीन वर्षांपूर्वीच सुरू झाली. मांडवा बंदर समुद्रात असल्याने पावसाळ्यात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याने बोटी थांबण्यास अडथळा निर्माण होतो; मात्र रेवस बंदरात असा धोका नसल्याने विकासाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. तर मुंबईतील भाऊचा धक्का आणि अलिबाग तालुक्यातील रेवस, त्याचबरोबर करंजा ते रेवसदरम्यानची प्रवासी जलवाहतूक अनेक वर्षांपासून सुरू आहे. कमी वेळा आणि स्‍वस्‍तात प्रवास होत असल्‍याने प्रवाशांची पसंतीही मिळत आहे. येथील रो-रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर नवी मुंबईसह, पनवेल, उरण, अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील प्रवाशांना सेवेचा मोठा फायदा होईल.

६० टक्के काम पूर्ण
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने यापूर्वी रेवस जेट्टीकरिता २५ कोटी सात लाखांची निविदा पास केली होती. जेट्टीसाठी आवश्यक उभ्या खांबांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्य प्लॅटफॉर्मचे काम आणि जेट्टीवरील स्लॅबचे काम मात्र अपूर्ण आहे. यातील १३ कोटी रुपये खर्चून संबंधित कंत्राटदाराने ६० टक्के जेट्टीचे काम पूर्ण केले आहे. या कामाचा मोबदला कंत्राटदाराला देण्यात आलेला आहे. जेट्टी आणि इतर कामासाठी १३ कोटी रुपये देणे शिल्लक आहेत. या शिल्लक कामाचा अंदाजित खर्च ३० कोटींच्या आसपास आहे.

प्रकल्‍पातील मंजूर कामे
रो-रो सेवा अनुषंगाने जेट्टी - १५ कोटी ९० लाख
प्लॅटफॉर्म - एक कोटी ८९ लाख
बंदरातील गाळ काढणे - २ कोटी ४१ लाख
विद्युत पुरवठा - ३४ लाख ७१
इतर खर्च - २ कोटी ९ लाख

-----

कंत्राटदाराला निर्धारित वेळेत काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणचे त्याचे साहित्य आणि साधारण ७० लाख रुपयांचे बिल देण्यात आले नाही. त्याचे काम रद्द करून उर्वरित कामासाठी नव्याने निविदा काढली जाणार आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच काम सुरू होईल.
- सुधीर देवरा, कार्यकारी अभियंता, मेरिटाइम बोर्ड

दोन्ही तालुक्यांना जोडणारा सर्वात जवळचा आणि कमी खर्चाचा जलमार्ग आहे. त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई या मार्गावरील जलवाहतूक सुरू होईल. बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत. उर्वरित कामांचा कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर काही महिन्यांतच पूर्ण होईल. याचदरम्यान रेवस-करंजा सागरी पुलाच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न असेल.
- महेंद्र दळवी, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT