सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : शनिवारपासून मॉन्सूनपूर्व पावसाची संततधार सुरू आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडत असून, रविवारी सकाळपर्यंत १३.४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मुरूड, रोहा आणि सुधागड तालुक्यात नोंदवला गेला. पावसाचे सातत्य कायम असून, पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने मच्छीमार, आंबा बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी खरिपाची कामे खोळंबली असून, शेतकरी अडचणीत येत आहेत. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ करू लागले आहेत. रविवारी सकाळी अनेक गावांना पावसाने झोडपले. त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात तसेच शेतमळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन तालुक्यात पावसाचा जोर जास्त असून, मासेमारी नौका बंदरात नांगरून ठेवणे अडचणीचे जात आहे. सर्वत्र चिखल झाल्याने जेसीबीच्या सहाय्याने समुद्रातून नौका काढताना जेसीबी चिखलात रुतून बसण्याच्या घटना आहेत. नौका शाकारून ठेवतानाही मुसळधार पावसात मच्छीमारांना कसरत करावी लागते. शुक्रवारपासून जिल्ह्यातील काही भागात सूर्यदर्शन झालेले नाही. मंगळवारपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
वीजपुरवठा खंडित
अलिबाग शहरातील पीएनपी नगर, बाह्यवळण मार्ग, कोळीवाडा, मेघा टॉकीजचा परिसरात पाणी साचले होते. ग्रामीण भागात शनिवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता, तो रविवारी सकाळपर्यंतही सुरळीत झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अशीच स्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.