सुधागडमध्ये तीन गावांत सशस्त्र दरोडे
ग्रामस्थांमध्ये दहशत; सोने, रोकड लंपास
पाली, ता. २७ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांत शनिवारी मध्यरात्रीनंतर तीन तासांत सशस्त्र दरोडे पडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शस्त्रांचा धाक दाखवून घरातील सोने आणि रोख रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले. चार ते पाच जणांची टोळी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले. या टोळीने घरातील लोकांना कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून घरातील सोने, रोख रक्कम, बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज लांबवला. यादरम्यान ग्रामस्थांनी तत्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली; मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते.
...................
पोलिसांकडून घटनास्थळी भेट
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवतारे, पोलिस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पाली पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानीय गुन्हे शाखेच्या टीम, दंगल नियंत्रक पथक यांनी भेट देऊन वेगाने तपास सुरू केला आहे.
-----
गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट
सशस्त्र दरोड्यांनी ग्रामस्थांवर भीतीचे सावट आहे. रात्री कोयता आणि तलवार घेऊन दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी आम्हाला धमकावले आणि घरातील सर्व मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले, असे हातोंड येथील एका महिलेने सांगितले.
---
सुरक्षेची मागणी
ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाई आणि गावात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
-----------
पाली : दरोडेखोरांनी चोरी करून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. (छायाचित्र : अमित गवळे)
----------
पाली : घटनास्थळी तपासणी करताना पोलिस. (छायाचित्र, अमित गवळे)