निर्विघ्न प्रवासासाठी रणनीती
गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : गणेशोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात एक लाख एक हजार १९८ तर २८६ खासगी सार्वजनिक मंडळे गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. या कालावधीत पाच ते सहा लाख चाकरमानी दाखल होणार असून, मुंबई-गोवा महामार्गावरून तळकोकणात १५ लाखांहून अधिक प्रवासी विविध वाहनांनी जाणार आहेत. चाकरमान्यांच्या सुखरूप प्रवासासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी (ता. १२) शांतता कमिटीची जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे बैठक घेतली. या वेळी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. महसूल, पोलिस, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा शासकीय विभागांनी गणेशोत्सव काळात केलेल्या उपाययोजना तसेच नियोजनाचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आढावा घेतला. कायदा-सुव्यवस्था राखणे, गणेशभक्तांना योग्य सुविधा देणे, चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल, या दृष्टीने उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
----
महामार्गावरील सुविधा
- पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट, सुविधा केंद्र, क्रेन, रुग्णवाहिका, होमगार्ड तैनात
- मुंबई-गोवा महामार्गावर पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोइंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष
- वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष
- मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष
-----
अवजड वाहनांना बंदी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार २३ ऑगस्ट सायंकाळपासून ते २९ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तसेच २ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपासून ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत तसेच ६ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत आदेश अमलात राहणार आहेत.
----
५९५ ठिकाणी विसर्जन व्यवस्था
- विसर्जनासाठी समुद्रावर ५२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तिथे निर्माल्य, विसर्जन सुविधेसह इतर सुविधा उपलब्ध दिल्या आहेत. त्याचबरोबर खाडीमध्ये १०५ ठिकाणी, नदीकिनाऱ्यावरील २४४ विसर्जन घाटांवर विसर्जन केले जाणार आहे.
- १०० तलावांमध्ये विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. येथील विसर्जन घाटावर दिवाबत्ती, खड्डे बुजवणे, घाटाची दुरुस्तीची कामे स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या माध्यमातून केली जात आहेत.
-----
पोलिस प्रशासनाची सज्जता
मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद ५ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. जिल्ह्यात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून, विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरिता पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज केले आहे.
----
सोशल मीडियावर लक्ष
गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, प्रशासकीय कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एटीबी, एटीसीचे पथक नेमण्यात आले असून, सोशल मीडिया देखरेखीसाठी सायबर सेल सतर्क आहे. शांतता कमिटी बैठका मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रूट मार्च सुरू आहे.
-----
महामार्गाच्या दुरुस्तीला वेग
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम असलेल्या रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजवणे अशी कामे वेगाने सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महामार्गाची एक मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे प्रवास सुरक्षित असेल, असा विश्वास प्राधिकरणाचे अधिकारी यशवंत घोटकर यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.