धावीर महाराजांना आज अभिवादन
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पालखी सोहळ्याचे आकर्षण
अलिबाग, ता. २ : रोहे शहरातील धावीर महाराज अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यानिमित्ताने दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या पालखी सोहळ्याला पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सलामीचा कार्यक्रम नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.
रोहा शहराचे आराध्य दैवत असलेल्या धावीर महाराज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घरभेटीला येतात. देव भेटीला येत असल्याने रोहे शहरात चैतन्याचे वातावरण असते. नवरात्रोत्सवानिमित्त १० दिवसांपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची यानिमित्ताने सांगता होते. या वेळी काढण्यात येणारी पालखी शहराला प्रदक्षिणा घातल्यानंतर २४ तासांनी धावीर महाराजांच्या मंदिरात येते. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातील भाविक उपस्थिती लावतात. या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. इंग्रजांच्या कार्यकाळापासून होणारा हा सोहळा प्रत्यक्ष पाहता यावा, यासाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिकृत सलामी देण्याची परंपरा असलेल्या काही मोजक्याच मंदिरांमध्ये आहे. त्यामध्ये रोहे शहराचे आराध्य दैवत असलेल्या धावीर महाराजांचे स्थान आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या परिसरात मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे.
----
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
रोह्याच्या विविध भागांत पालखी फिरते. खंडेराय मंदिरानजीक धाकसूत देवस्थापानापाशी येते. धाकसूत हे धावीर यांचे थोरले बंधू. यानिमित्त दोघा भावांची गाठभेट घडवून आणली जाते. दुपारी मोरे आळीतील कुलकर्ण्यांच्या वंशजांच्या अंगात महाराजाचे वारे येते. तेव्हा महाराजांची मूळ तलवार त्यांच्या हातात दिली जाते. हा क्षण पाहण्यासाठी रोहेकर एकवटलेले असतात. त्यानंतर दमखाडी बाजारपेठेतून पालखी अंधार आळीत सुभेदार देशमुखांच्या वंशजांकडून भाविकांना दूध, फराळ दिला जातो. त्यानंतर ब्राह्मण आळी, मोरे आळी आणि इतर परिसरातून पालखी मंदिराजवळ येते.
----
खंडित परंपरा पुन्हा सुरू
ब्रिटिशांच्या काळापासून देवस्थानास पोलिसांची मानवंदना देण्याचा बहुमान देण्यात आला आहे. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असता, पुलोद शासनामधील पालकमंत्री बी. एल. पाटील यांच्या विनंतीवरून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ही मानवंदना पुन्हा सुरू केली. देवस्थानाला दिली जाणारी पोलिस वंदना हे या देवस्थानाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. श्री धावीर महाराज यांची नवरात्री उत्सवाबरोबर पालखी मिरवणूक म्हणजे रोहेकरांसाठी कौटुंबिक धार्मिक सोहळाच असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.