पालीत कचऱ्याची समस्या गंभीर
घंटागाड्या असूनही कचरा उघड्यावर; बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मागणी
पाली, ता. २९ (वार्ताहर) ः प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. नगर पंचायतीमार्फत शहरामध्ये घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक भरवस्तीत रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या पुरेशा पाच घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्या येथील विविध भागांत दररोज निश्चित वेळेत फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून एकही दिवस सुट्टी घेतली जात नाही. अगदी दिवाळीतदेखील घंटागाडी नियमित येत होती; तरीही अनेक ठिकाणी रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. प्रामुख्याने बल्लाळेश्वर नगरकडे जाणारा मार्ग, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी समाज भवनशेजारी आणि त्यापुढे, मधली आळी, राम आळी, जुने पोलिस स्थानक, आगर आळी, भाग्यश्री प्लाझा इत्यादी ठिकाणी रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येतो. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार आणि अनेक नागरिक घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच रस्त्यावर टाकतात. दिवसभर घरी नसलेले काही जण जमा झालेला कचरा रस्त्याकडेला टाकून देतात. परिणामी कचऱ्याची समस्या जैसे थे राहते. यामुळे नागरिकांसह भाविकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजूच्या गटारात पडते. त्यामुळे गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवत आहेत.
.............
चौकट 2
योग्य नियोजन व प्रबोधन हवे
नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. तसेच कचरा संकलित करताना ओला, सुका, घरगुती, घातक, प्लॅस्टिक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणाचे काम होणे आवश्यक आहे, तरच कचराकोंडी सुटण्यास मदत होईल, असे बोलले जात आहे.
..................
घातक कचरा
रस्त्याकडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये मद्याच्या बाटल्या तसेच घरगुती सामानदेखील असते. या फुटलेल्या काचेच्या बाटल्या जनावरे तसेच कर्मचाऱ्यांच्या पायाला लागून इजा होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांच्या पोटामध्ये येथील घातक पदार्थ आणि प्लॅस्टिकदेखील जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होतो.
.................
सूचना व माहिती फलकांकडे दुर्लक्ष
ज्या ज्या ठिकाणी रस्त्याकडेला कचरा टाकला जातो त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून सूचना व माहिती फलक लावण्यात आले आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, हेदेखील येथील फलकांवर नमूद केले आहे. मात्र नागरिक या फलकांकडे दुर्लक्ष करून त्याच्या आजूबाजूलाच कचरा टाकताना दिसून येत आहेत. काही ठिकाणचे माहिती व सूचनाफलक फाटले आहेत.
................
पाली नगरपंचायतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पाली शहर कचराकुंड्यामुक्त केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपला कचरा येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा, जेणेकरून आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. हटविण्यात आलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही कोणी कचरा टाकताना आढळल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दंडात्मक कारवाईदेखील करीत आहोत. या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. तसेच वारंवार सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज आहे.
- माधुरी मडके, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.