प्रोपेन पाइलाइनला शेतकऱ्यांचा विरोध
शहाबाज येथे खासगी जमिनीतून प्रकल्प; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : गेल इंडिया कंपनीसाठी शहाबाज परिसरातून प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रोपेन पाइपलाइन प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत चालला आहे. सरकारी जमीन उपलब्ध असतानादेखील खासगी शेतजमिनीतून, तेही पोलिस बंदोबस्तात पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात हजारो शेतकरी आक्रमक झाले असून, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहाबाज गावातील शेतकऱ्यांनी सांगितले, की भातशेतीतून पाइपलाइन टाकण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असतानाही संबंधित यंत्रणांकडून भुईभाड्याचे प्रलोभन दाखवले जात आहे. काही शेतकऱ्यांना थेट फोन करून पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले जाईल, अशा धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच पाइपलाइनचा मार्ग तातडीने बदलण्यात यावा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. विशेष म्हणजे शहाबाज येथील सरकारी खलाटी गट क्रमांक ३४६ ही पर्यायी जमीन उपलब्ध असतानाही ती बाजूला सारून खासगी शेतजमिनींतून पाइपलाइन टाकण्याचा आग्रह धरला जात आहे. लेखी हरकती नोंदवूनही गेल इंडिया कंपनीकडून अथवा संबंधित शासकीय यंत्रणेकडून कोणतीही स्पष्ट माहिती अथवा निर्णय शेतकऱ्यांना कळविण्यात आलेला नाही. गेल इंडियाच्या महाप्रबंधकांनी या हरकतींवर काय कारवाई केली, याबाबतही अनभिज्ञता कायम आहे. भातशेतीतून पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून मानसिक व आर्थिक त्रास दिला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या या भागात अशा प्रकारे प्रकल्प राबविल्यास दीर्घकालीन नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत संघर्ष तीव्र केला जाईल, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
..........
मोबदल्यातील दुजाभाव अन्यायकारक
दरम्यान, मोबदल्याच्या मुद्द्यावरही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उरण तालुक्यात गेलच्या गॅस पाइपलाइनसाठी शेतकऱ्यांना प्रति गुंठा सहा लाख रुपयांचा मोबदला दिला जात असताना, अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ प्रति गुंठा एक लाख रुपयांचा मोबदला दिला जात आहे. हा दुजाभाव अन्यायकारक असून, अलिबागमधील शेतकऱ्यांवरच असा अन्याय का केला जातो, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी उपस्थित केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात, मार्ग बदलाचा पर्याय स्वीकारावा व समान मोबदल्याची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.