सुधागडमध्ये महायुतीबरोबर शेकाप, उबाटाची एकजूट
भाजपच्या तालुक्याबाहेरील उमेदवाराला तीव्र विरोध; सर्वपक्षीय ‘सुधागड सन्मान समिती’चा एल्गार
पाली, ता. २१ (वार्ताहर) : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात राजकीय इतिहासात नोंद घ्यावी, अशी अभूतपूर्व घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद गटासाठी तालुक्याबाहेरील उमेदवार आयात केल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, या असंतोषातूनच भाजपमधील नाराज गट, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) एकाच व्यासपीठावर आले आहेत.
या अभूतपूर्व एकजुटीमधून ‘सुधागड सन्मान समिती’ या नव्या सर्वपक्षीय आघाडीचा उदय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोमवारी (ता. १९) रात्री झालेल्या बैठकीत विविध पक्षांचे नाराज पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत बोलताना स्थानिक नेत्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. सुधागड तालुक्यात अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देणे म्हणजे तालुक्याच्या स्वाभिमानावर घाला आहे, अशी भावना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली. देश व राज्यपातळीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष असताना, सुधागडमध्ये मात्र भाजपविरोधात भाजपसह सर्व पक्ष एका झेंड्याखाली येणे ही राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना ठरली आहे. देशातील सर्वात बलाढ्य पक्ष असलेल्या भाजपला रोखण्यासाठी सुधागडमध्ये उभी राहिलेली ही “विचित्र पण ऐतिहासिक” युती यशस्वी ठरणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ही एकजूट केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार की त्यामुळे तालुक्याची राजकीय समीकरणे कायमस्वरूपी बदलणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
..................
चौकट १ : ‘सुधागड सन्मान समिती’चे संभाव्य जागावाटप
भाजपच्या उमेदवाराविरोधात समितीने तगडी मोर्चेबांधणी करत संभाव्य जागावाटप जवळपास निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जांभुळपाडा जिल्हा परिषद गट – संभाव्य उमेदवार : शिवसेना (शिंदे गट), जांभुळपाडा पंचायत समिती गण- शिवसेना (शिंदे / उबाठा), परळी पंचायत समिती गण - शिवसेना (शिंदे / उबाठा),
राबगाव जिल्हा परिषद गट -शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), राबगाव पंचायत समिती गण - शिवसेना (शिंदे गट), अडुळसे पंचायत समिती गण- राजेश मपारा (सुधागड सन्मान समिती),
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.